बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

तुम्ही स्वस्थ आहात काय ?


 

प्रसंग  १ -

   “ डॉक्टर , ही माझी फाईल. सगळे रिपोर्ट आहेत त्यात. फुल बॉडी चेकच करून घेतलीय. “ एक रुग्ण.

सगळे रिपोर्ट बारकाईने बघितले . काही आकडे बोर्डर लाईन होते. काही थोडेसेच वाढलेले होते.

  “ तुम्हाला काय काय त्रास होतोय ? मी विचारले.

“ त्राsssस असा काही नाही.  पण बघा ना . काही रिपोर्ट वर त्यांनी मार्किंग केले आहे. काही मोठा आजार आहे का ? ते रिपोर्ट पाहून मला धडधड होतीय.

प्रसंग २-

    ऑफर मध्ये स्ट्रेस टेस्ट झाली. ५५ वयाच्या बाई. मला काहीच त्रास नाही. काही वर्षांपूर्वी माझा खूप मोठा अपघात झालेला. मी बरेच महिने बेड वर होते. आता सगळे नॉर्मल आहे. मी सकाळी फिरायला जात नाही कारण माझ्या कामानिमित्त मला खूप चालावे लागते. भरभर चालले कि लागतो थोडा दम पण मी हळूहळू चालतच जाते सगळीकडे. पाठ कंबर वगैरे दुखत असते. पण ते अपघातामुळे.

   या बाईंची स्ट्रेस टेस्ट positive आली. म्हणजे चालताना हृदयाला रक्त पुरवठा कमी पडत होता. आणि ecg मधले बदल खूप मोठ्या प्रमाणात होते. तसे मी त्यांना सांगितले.

   “ छे छे . मला काहीच त्रास नाहीये . मी भरपूर चालते. असे काहीच शक्य नाही. “ असे म्हणून त्यांनी मान्यच केले नाही कि त्यांचा रिपोर्ट खराब आलाय.

   काही जण रिपोर्ट मधल्या आकडेवारी ला खूप घाबरतात. तर काही जण रुटीन चेकिंग च्या रिपोर्ट मधला खराब रिपोर्ट मान्यच करायला तयार नसतात. तर काही जण ( तुमचा विश्वास बसणार नाही पण ... ) खूप मोठे फुल बॉडी चेक अप चे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले म्हणून थोडे नाराजच होतात. का ? तर एवढे पैसे खर्च करून काहीच निघाल नाही म्हणून.

     वैद्यकीय दृष्ट्या फक्त रिपोर्ट किंवा फक्त लक्षणे या पेक्षा प्रत्यक्ष रुग्ण तपासणी + रिपोर्ट याला जास्त महत्व आहे. पण मुळात आपण आपले शरीर लहानपणापासून सांभाळत असतो. मला काहीच त्रास नाही असे असताना रिपोर्ट खराब आले तर आपण स्वताला फसवत नाही न ? आपण आपल्या शरीराकडे बारकाईने लक्ष देतोय का ? हे जाणीवपूर्वक पाहायला हवे.

     या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाने सांगितलेली स्वस्थ मनुष्याची व्याख्या फार महत्वाची आहे. काय आहे ती?

                    समदोष: समाग्निश्च समधातू मलक्रिया  

                    प्रसन्नआत्मेंद्रिय मन: स्वस्थ इत्याभिदियते

      म्हणजे काय ? स्वस्थ असण्यासाठी वात ,पित्त,कफ हे तीन दोष ,सात धातू ,तीन मल आणि अग्नी यांनी साम्यावस्थेत असणे आवश्यक आहे. साम्यावस्थेत म्हणजे कसे ? गरजेपेक्षा जास्त नको कमी पण नको, नि खराब झालेले पण नको ( abnormal ) . आत्मा मन पंच ज्ञानेंद्रिये ही प्रसन्न हवी.

      आता स्ट्रेस टेस्ट चा रिपोर्ट किंवा MRI चा रिपोर्ट ची भाषा जितकी आपल्याला अगम्य वाटते तितकेच दोष धातू मल आत्मा वगैरे अगम्य वाटते नाही का ? म्हणजे खूप जण माझा वात वाढलाय , पित्त झालय मला , किंवा कफ झालाय या भाषेत बोलत असतात पण आयुर्वेदाला अपेक्षित वात पित्त कफ आणि तुम्हाला अपेक्षित वात पित्त कफ हे तसे वेगळे. आयुर्वेदातले सात धातू फारसे सामान्य माणसाला माहित नसतात . धातू म्हणजे लोखंड तांबे पितळ एवढेच माहित असते. शरीरातले धातू काय भानगड बुवा ?  मल म्हणजे मल , मूत्र स्वेद हे होय. हे समजाण्यासारखे आहे.  यात ‘एक सम अग्नी’ असेही लिहिलेले  आहे. अग्नी म्हणजे अन्नपचनासाठी आवश्यक असणारा. ( या पाचकाग्नी व्यतिरिक्त धात्वाग्नी वगैरे अजून बरेच प्रकार सांगितले आहेत ते सोडून देऊ सध्या. )  पुढच्या ओळीतले आत्मा, इंद्रिय ( पंच ज्ञानेंद्रिये ), आणि मन मात्र आपल्याला बर्यापैकी माहित असते.

       आधुनिक वैद्यक शास्त्र काय म्हणते याबद्दल ? जागतिक आरोग्य संघटनेने स्वस्थ व्यक्तीची व्याख्या खालील प्रमाणे केली आहे.

Health is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity.

     म्हणजे फक्त आजार नसणे म्हणजे हेल्थी असणे असे नाहीये. तर शारीरिक मानसिक आणि सामाजिक अर्थाने पण तुम्ही निरोगी असणे गरजेचे आहे. सामाजिक कसे ? त्या व्यक्तीच्या वागण्याचा समाजाला त्रास होत असेल तर तो आजारीच नाही का ?

    दोन्ही व्याख्या या तशा साधारण एकच मतितार्थ सांगणाऱ्या आहेत. मात्र आयुर्वेदाची व्याख्या ही अधिक व्यापक आणि स्पष्टता असणारी आहे. शारीरिक निरोगीपण ( physical well- being ) ओळखण्यासाठी सुद्धा आयुर्वेदाने मापदंड दिलेले आहेत. दोष धातू मल आणि अग्नी साम्यावस्थेत असणे हे ते मापदंड. आता हे कसे बरे ओळखायचे ? ते तर फक्त आयुर्वेद शिकालेल्यानच कळू शकेल .

    पुढच्या ब्लॉग मध्ये आपण अगदी थोडक्यात गरजेपुरती ढोबळ मानाने या तीन दोष आणि सात धातूंची ओळख करून घेणार आहोत. मग त्यानंतर मग पुढचे आयुर्वेदावरचे लेख समजायला सोपे जाईल .


डॉ.आनंदी साठये 

( माधवबाग नाशिक सेन्ट्रल  & नाशिक रोड क्लिनिक ) 

एम.डी.( आयुर्वेद ) 

   

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...