कोरोनरी स्टेनोसिस/ अथेरोस्क्लेरॉसीस - सामान्य भाषेत ब्लॉकेजेस
ब्लॉकेजेस कसे तयार होतात त्याच्या पायऱ्या अशा आहेत
1. अथेरोस्क्लेरॉसीस ची सुरुवात रक्तवाहिनीच्या आतल्या अस्तराला नुकसान होण्यापासून होते .रक्तवाहिनीच्या आतील स्तराचे नुकसान (Endothelium dysfuncion)खालील कारणांमुळे होते:
- उच्च रक्तदाब
- मधुमेह
- धूम्रपान
- रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल
- दीर्घकालीन दाह (chronic inflammation)
या एंडोथॅलियल डिसफंक्शन मुळे रक्तातले फॅट आत म्हणजे रक्तवाहिनीच्या अस्तरात शिरू शकते .
2. मेद व कोलेस्टेरॉल साचणे
- LDL कोलेस्टेरॉल रक्तवाहिनीच्या भित्तीत शिरते
- ते ऑक्सिडाईज होऊन अधिक घातक बनते
- त्यामुळे दाह ( inflammation) वाढतो
3. दाहजन्य पेशींची वाढ
- पांढऱ्या रक्तपेशी (monocytes) धमनीत प्रवेश करतात .त्या फोम सेल्स बनतात
- यामुळे फॅटी स्ट्रिक तयार होतात (प्रारंभीची अवस्था)
4. अॅथेरोमॅटस प्लाक तयार होणे
- स्मूथ मसल सेल्स वाढतात
- कोलेजन, तंतू जमा होतात , फायब्रस कॅप तयार होते
- आत मेदयुक्त कोर (lipid core) तयार होतो
- आता ईथे आपले ब्लॉकेजेस तयार झाले . हे ब्लॉकेजेस रक्तवाहिनीच्या आतल्या अस्तरात तयार झालेले आहेत , आता ते रक्तवाहिनीच्याआतल्या बाजूला वाढतात कि बाहेरच्या बाजूला वाढतात हेही पाहणे महत्वाचे ठरते. हे ब्लॉकेजेस बाहेरच्या बाजूला वाढले तर त्याला पॉझिटिव्ह रिमॉडेलिंग असे म्हणतात. हे बाहेरच्या बाजूला वाढलेले ब्लॉकेजेस अन्जिओग्राफी मध्ये दिसत नाहीत .ते फक्त CT अँजिओ मध्ये दिसू शकतात , आणि हे ब्लॉकेजेस जास्त धोकादायक असू शकतात. (vulnerable )म्हणजे अँजिओग्राफी मध्ये टक्केवारी कमी असूनही रक्तवाहिनीमध्ये हार्ट अटॅक निर्माण करणारी घटना चालू असू शकते.
- या विरुद्ध निगेटिव्ह रिमॉडेलिंग म्हणजे रक्तवाहिनीची पोकळी व्यापणारे ब्लॉकेजेस .हे मात्र अँजिओग्राफी मध्ये दिसतात . .
- या ब्लॉकेजेस वरती हळूहळू फायबरचे आवरण म्हणजे कॅप्सूल तयार होते .हे आवरण जेवढे पातळ तेवढा ब्लॉक फुटण्याची शक्यता अधिक. जेवढे हे आवरण जाड तेवढे हे ब्लॉकेजेस स्टेबल असतात.
- प्लाक फुटला तर काय होते ? रक्ताची गुठळी तयार होते .अस्थिर प्लाक फुटू शकतो. प्लेटलेट्स जमा होऊन रक्ताची गुठळी (thrombus) तयार होते .यामुळे हार्ट अटॅक होऊ शकतो.
पण हार्ट अटॅक काही प्रत्येक ब्लॉकेजेस च्या रुग्णांना येत नाही .
रक्तवाहीनीची पोकळी व्यापणारे ब्लॉकेजेस झाल्यावर लक्षणे काय निर्माण होतात ?
या रक्तवाहिन्या ब्लॉकेजेस मुळे( निगेटिव्ह रिमॉडेलिंग मुळे ) अरुंद झाल्या तरी लगेच लक्षणे निर्माण करतीलच असे नाही. किंवा अमुक टक्के ब्लॉकेजेस म्हणजे अमुक लक्षण असेही त्याचे गणित नसते.
या कोरोनरी म्हणजे हृदयाच्या या रक्तवाहिन्या हृदयाला रक्तपुरवठा करित असतात . आपण विश्रांती अवस्थेत असताना आपल्या हृदयाला साधारण 250 मिली एवढे रक्त पुरते. ब्लॉकेजेस कितीही टक्के असले तरी एवढा रक्तपुरवठा रक्तवाहिन्यांकडून केला जातो त्यामुळे फारसे श्रम न करणाऱ्या व्यक्तीस कोणताच त्रास होत नाही .
आता काही शारीरिक श्रम करताना हृदयाला ( मायोकार्डियम ) दुप्पट ते चौपट रक्तपुरवठा गरजेचं असतो. मग या रक्तवाहिन्यांचे विस्फारण होते आणि तेवढा अतिरिक्त रक्तपुरवठा केला जातो. इथे हे ब्लॉकेजेस लक्षणे निर्माण करू शकतात . कसे ? या ब्लॉकेजेस मुळे रक्तवाहिन्यांची विस्फारण क्षमता बरेचदा कमी झालेली असते. यामुळे तुमच्या श्रमानुसार म्हणजे मागणीनुसार पुरवठा झाला नाही तर ?? तर काय होईल ?? हृदयाला ( मायोकार्डियम ) रक्तपुरवठा कमी होईल . याला वैद्यकीय भाषेत ischemia असे म्हणतात. श्रमाच्या वेळेस असा रक्तपुरवठा कमी पडला कि श्रम केल्यावर दम लागणे ,छाती जड पडणे, छातीत दुखणे ,थकवा येणे किंवा धडधड होणे अशी लक्षणे दिसतात. विश्रांती घेतली कि हि लक्षणे लगेच थांबतात.
म्हणजे ब्लॉकेजेस मुळे हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा ISCHEMIA होऊ शकतो.
हृदय रोगावर ट्रीटमेंट करताना ब्लॉकेजेस कसे होतात हे समजल्यानंतर ते कमी कसे करायचे आणि ते स्टेबल कसे करायचे हे समजणे सोपे जाईल. तसेच ब्लॉकेजेस मुळे होणाऱ्या ISCHEMIA वरही आपल्याला काम करता येईल .
पण त्याआधी हे ब्लॉकेजेस आपल्याला नक्की कोणत्या तपासण्या करून समजणार आहेत ? फक्त अँजिओग्राफय पुरेशी आहे का हे पाहू या .
9226958538
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा