गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

पानी पानी रे......


 

“ डॉ. बघा मी ८ बाटल्या पाण्याच्या भरून ठेवतो . तेवढे प्यायचेच . सगळे toxins  बाहेर पडून जातील न ? “ हल्ली फार acidity होते ही तक्रार घेऊन आलेले एक जण सांगत होते .

“ का ? असे ८ बाटल्या असे का ? नक्की कुणी सांगितले तुम्हाला असे बाटल्यांमधून मोजून पाणी प्यायला ?  “ मी उत्सुकतेने विचारले 

 “ ही  water therapy आहे. तुम्हाला नाही माहित का ? आयुर्वेदातच सांगितली आहे की  . म्हणजे उठल्या उठल्या तोंड न धुता ८ ते १० ग्लास पाणी प्यायचे . आणि नंतर उरलेले दिवसभरात दर २ तासाने त्याने शरीरातले सगळे विषारी पदार्थ निघून जाऊन शरीर शुद्ध होते म्हणे. “

  ही थेरपी आयुर्वेदात सांगितलेली आहे हा या गृहस्थांचा गैरसमज काढायला मला तासभर लागला.

आता हे वाचून  तुम्ही विचारालच मग रोज नक्कि किती पाणी प्यायचे आम्ही ? 

त्यासाठीच आजचा पाणीप्रपंच .

   आपल्या शरीरात ५० ते ६० टक्के पाणीच असते हे आपण शालेय जीवनापासून शिकलो. आपण दिवसभरात जे काही खातो पितो त्यातून शरीरात पाणी जात असते. नि घामावाटे, श्वासावाटे ,मलावाटे आणि मूत्रवाटे पाणी बाहेर टाकले जाते. पण यात सगळ्यात स्मार्ट काम हे किडनी करत असते. म्हणजे शरीराची गरज ओळखून किडनी जास्त पाणी बाहेर काढायचे कि कमी हे ठरवत असते. या किडनीवर मेंदूचे नियंत्रण असते. नि किडनीला काम चोख पणे करण्यासाठी हृदय रक्त पुरवत असते. शरीतातील द्रव पदार्थ कमी झाला कि तहान निर्माण होते आणि आपण पाणी पितो .पण आपण फक्त तहान लागली तरच पाणी पितो का ? नाही तर विविध खाद्य पदार्थ , फळे , सरबते , शीतपेये यातूनही शरीरात पाणी जात असते. घामावाटे श्वासावाटे बाहेर पडणारे पाणी हे आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असते. खूप शारीरिक कष्ट , भरपूर व्यायाम , खेळ , उन्हाळा , दमट हवा  , या सगळ्यात हे प्रमाण  वाढत असते. मग शरीरात पाण्याचा समतोल राखण्याचे काम किडनी करत असते. नि या किडनीची समतोल राखण्याची क्षमता प्रचंड असते. तुम्ही गरज नसताना पाणी प्याले , अतिरिक्त प्यायले तरी ती ते पाणी बाहेर काढून टाकण्यास सक्षम असते. किंवा पाणी काही कारणाने कमी प्याले गेले तर ती ते पाणी राखूनही ठेवते. आणि म्हणूनच स्वस्थ माणसाने पाणी कमी जास्त प्यायले तरी पटकन काही दुष्परिणाम जाणवत नाहीत. महत्त्वाचे  म्हणजे अमुक इतकेच लिटर पाणी रोज प्यायला हवे असा कोणताही निष्कर्ष  किंवा संशोधन आधुनिक शास्त्रातही नाहीये. किंबहुना पाणी किती प्यावे तर तहान लागेल इतके असेच ढोबळमानाने  सांगितले आहे. पण मग जास्त पाणी प्यायल्याने काय त्रास होणार आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जेंव्हा किडनी स्वतः आजारी असेल , किंवा तिला रक्तपुरवठा करणारे हृदय अशक्त झाले असेल , किंवा किडनीवर नियंत्रण ठेवणारी मेंदूतली यंत्रणा बिघडवणारे आजार झाले असतील तर  या सर्व रोगांमध्ये डॉक्टरांना विचारल्याशिवाय पाणी कमी जास्त करू नये. किडनी जर समतोल राखतीय नी ती आजारी असेल तर तुम्हृही प्दयायलेले जास्तीचे पाणी बाहेर काढून टाकता आले नाही तर ते शरीरात साठून राहून शरीराला धोका निर्माण करेल. म्हणून हृदय कमकुवत असताना , शरीरात सूज असताना तर जास्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते . त्यामुळे आजारी मनुष्याने डॉक्टरांना विचारल्याशिवाय कुठेतरी वाचून कसलेसे प्रयोग करू नये.

आता आयुर्वेद मात्र पाणी पिण्याविषयी सविस्तर सूचना देते बरे का , 

  आयुर्वेदाने पाणी नेहमीसाठीच उकळवून प्यायला सांगितले आहे. थंड ऋतू मध्ये कोष्ण म्हणजे कोमट पाणी तर उष्ण ऋतुंमध्ये उकळवून गार केलेले पाणी म्हणजे श्रुतशीत जल प्यावे. तहान लागली कि पाणी प्यावे हा नैसर्गिक नियम आयुवेदाने पण सांगितला आहे. किंबहुना तहान म्हणजे तृष्णा हा एक नैसर्गिक वेग असून तो अधारणीय आहे. म्हणजे तहान लागल्यावर ती अडवून धरू नये. जर तहान खूप काळ अडवून धरली तर तोंड कोरडे पडणे , डोके दुखी , चक्कर येणे ही लक्षणे जाणवतात .तसेच विनाकारण तहान नसताना पाणी पिण्यास मनाई केलेली आहे. पाण्याचेही अजीर्ण होते. अशा वेळेस सिद्ध जलाचा उपयोग करावा लागतो. सिद्ध जल म्हणजे औषधी द्रव्य टाकून पाणी उकळवून मग गाळून ते पाणी पिणे. ताप , सर्दी , अपचन,  अजीर्ण, काही मूत्र विकार अशा आजारात या सिद्ध जलाचा वापर केला जातो. 

जेवण करताना की केल्यावर की  आधी पाणी प्यावे या विषयी मार्गदर्शन करताना आयुर्वेद म्हणतो – 

अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम

भोजने च अमृतम वारि भोजनान्ते विषप्रदम

म्हणजे काय ? अजीर्ण अपचन झाल्यावर पाणी हे औषध आहे. ( अपचन झाल्यावर अन्न न घेता फक्त कोमट पाणी किंवा शुण्ठी सिद्ध जल पीत राहावे ) . जेवण पचल्यानंतर म्हणजे दोन तीन तासाने पाणी पिणे चांगले. तसेच जेवण झाल्या झाल्या लगेच घटाघट पाणी पिण्या ऐवजी जेवताना थोडे थोडे पाणी पिण्याने पचन व्यवस्थित होते. 

    सतत पित्ताचा त्रास होणे , ढेकर , gas होणे बारीक पण अधून मधून नेहमी पचनाच्या तक्रारी असणे या खुपदा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे असू शकतात. त्या सवयी दुरुस्त केल्या कि लक्षणांपासून सुटका होते.

या होत्या पिण्याच्या ( पाणी ) सवयींविषयी .

पुढच्या भागात पाहू खाण्याच्या सवयींविषयी सविस्तर.......

बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१

दिवाळी अभ्यंग आणि पहाटे उठणे .........


उठा उठा दिवाळी आली

अभ्यंग स्नानाची वेळ झाली .

           हल्ली अभ्यंग स्नान हे दिवाळीपुरतेच उरलेय नाही का ? अभ्यंग आणि पहाटे उठणे या दोन शब्दांशी दिवाळीचा संबंध येतो खरा पण हा आयुर्वेदातल्या दिनचर्येचा भाग आहे. अभ्यंग म्हणजे स्नेहन म्हणजे हल्लीचा मसाज होय. मात्र तेलाने केलेला मसाज होय. आयुर्वेदात ग्रीष्म ऋतु म्हणजे कडक उन्हाळा सोडून बाकी सर्व ऋतुत रोज अभ्यंग करायला संगितले आहे. विशेषत: हेमंत ऋतुत म्हणजे थंडीत त्याचे जास्त महत्व आहे. आणि म्हणूनच थंडीत येणारा सण दिवाळीतल्या परंपरेमध्ये अभ्यंगाचा समावेश झालेला दिसतो. नित्य अभ्यंगामुळे म्हातारपण दूर ढकलले जाते , त्वचा तजेलदार राहाते , श्रम नाहीसे होतात , स्नायू पुष्ट होतात , झोप चांगली लागते. शरीर दृढ म्हणजे घट्ट आणि क्लेशसह म्हणजे त्रास सहन करता येईल इतके मजबूत होते . नित्य अभ्यंग करावयाचे तर घरच्या घरी अंघोळीच्या आधी तिळाचे तेल लावून करू शकता .अभ्यंग म्हणजेच स्नेहन या उपचाराचा वापर अनेक व्याधींमधे होतो. मात्र ते आयुर्वेद प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टर च्या सल्यानेच करावे . कारण काही अवस्थेमध्ये स्नेहन करू नये असेही संगितले आहे.

   माधवबागेने याच स्नेहन उपचाराचा अंतर्भाव आपल्या संशोधनसिद्ध चिकित्सापद्धतीत केलेला आहे. आणि सर्व प्रकारचे जीवनशैलीचे रोग या चिकित्सापद्धतीने बरेही करता येतात असेही सिद्ध केले आहे.

    हे सर्व अभ्यंगविषयी. दिवाळीत दूसरा संदर्भ येतो तो पहाटे उठण्याविषयी.        अर्थात आयुर्वेदाने रोजचं ब्राह्म मुहूर्तास उठावे असे म्हटले आहे . ब्राह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी जवळजवळ दीड तास . हल्ली पहाटे उठून अभ्यास करण्याची पद्धत इतिहासकालीन ठरलीय . अभ्यासाठी नाईट मारत म्हणजे रात्रभर जागणारी आताची तरुण पिढी . पण मुळात लवकर का उठायचे हा या पिढीचा प्रश्न असतो . मग या मागचे कारण समजावून घेऊ .

   दिवस आणि रात्र मिळून 24 तासात प्रत्येक साधारण चार तासाने शरीरातील दोषप्राबल्य बदलत असते. (मागच्या एका लेखात मी आयुर्वेदातील वात पित्त कफ या दोषांबद्दलसांगीतलेले आठवत असेल.) खालचा रंगीत तक्ता बघून तुमच्या लक्षात येईल की सूर्योदयाआधी वात दोषाचा काल असतो . सूर्योदयानंतर लगेच कफ काल सुरु होतो. मग सकाळी १० नंतर दोन वाजेपर्यंत पित्त काल असतो , ज्या काळातच जेवण झाले पाहिजे. मग दोन नंतर परत वात पित्त कफ असे उरलेल्या वेळेत दोषप्राबल्य असते

     पहाटे २ ते सकाळी ६  या वातकाळात उठले तर उत्साह असतो शारीरिक गती सुरू झालेल्या असतात. त्यामुळे मन ही जागृत झालेले असते. त्यामुळेच या काळात केलेला अभ्यास लक्षात राहात असावा. सूर्योदयानंतर कफ काळ चालू होतो . मग थोडी एनर्जि मंदावलेली असते. अशा वेळेस उठायचे झाल्यास परत झोपायची इच्छा होते. ज्यांना पोट साफ न होण्याची तक्रार असते त्यांनी तर वात काळातच उठले पाहिजे. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी सकाळच्या कफ काळात( ६ ते १० ) भरपूर घाम गाळला पाहिजे. आता ६ ते १० म्हणजे नाश्त्याची वेळ .  मग नाश्ता कुणी करावा कुणी करू नये नि नक्की किती नि काय खावे हा सल्ला त्या व्यक्तीच्या प्रकृतीमधला दोष आणि रोग हे पाहूनच द्यायला लागेल , अशा प्रकारे  या दोषघड्याळाचा  उपयोग स्वास्थ्य रक्षणासाठी तर आहेच पण एखादा आजार झालेला असताना त्या आजारात  सुरूवातीला कोणता  दोष वाढलेला आहे या वरुन आयुर्वेद तज्ञ तुम्हाला नुसती दिनचर्या बदलून पण बरे करू शकतो. पण दिनचर्या बदलायला आपण सहजा सहजी तयार  होत नाही म्हणून मग औषधांची गरज पडते . प्रत्येकाची दोष प्रकृतीनुसार दिनचर्या सांगता येणे शक्य आहे . कोणत्या प्रकृतीला जागरण केलेले सोसणार आहे , कुणी कधीतरी उशिरा पर्यन्त झोपलेले चालू शकते वगैरे वगैरे.  परत निसर्गाचेही एक घड्याळ असते . ज्याला आपण ऋतु असे म्हणतो . एका वर्षात जे सहा ऋतु असतात त्यातही वेगवेगळे दोष कमी अधिक असतात.( त्या विषयी नंतर सविस्तर लिहिणारच आहे )

      म्हणजे बघा ,दिवसाच्या प्रहरामधले दोष , त्या त्या ऋतूंमांधले दोष , व्यक्तीच्या प्रकृतीमधले दोष इतक्या सर्वांचा विचार केला तर प्रत्येकाचा  व्यक्तीगत वैद्यकीय सल्ला हा वेगवेगळा असणार नाही का ? आयुर्वेद इतका सूक्ष्म रीतीने वैयक्तिक विचार करते.

दिवस भरातले दोष चक्र -

 


   राऊंड द क्लॉक शरीरातील दोष स्थिति बदलणे म्हणजेच हे शरीरातले बॉडी क्लॉक होय. हेच बायोलॉजिकल क्लॉक . याला circadian र्‍हीदम असे म्हणतात

       1729 मध्ये, फ्रेंच शास्त्रज्ञ जीन-जॅक डी'ऑर्टस डी मायरन यांनी दैनंदिन उत्तेजनांच्या प्रतिसादापासून अंतर्गत  घड्याळ वेगळे करण्यासाठी पहिला प्रयोग केला. मिमोसा पुडिका या वनस्पतीच्या पानांच्या हालचाली (जरी झाडे सतत अंधारात ठेवली तरी )  कायम राहिल्याचे त्यांनी नमूद केले. हा बायोलोजिकल क्लॉक चा पहिला  शोध. त्या नंतर फळ मशीवर काही प्रयोग झाले Drosophila circadian rhythm have paved the way for understanding circadian behaviour and diseases related to sleep-wake conditions in other animals, including humans.

   2017 मध्ये discoveries of molecular mechanisms controlling the circadian rhythm या शोधासाठी Jeffrey C. Hall, Michael Rosbash आणि Michael W. Young या दोघांना नोबेल प्राइज मिळाले.

काय सांगतो हा circadian rhythm??

The circadian clock anticipates and adapts our physiology to the different phases of the day. Our biological clock helps to regulate sleep patterns, feeding behavior, hormone release, blood pressure, and body temperature. अजून या शोधाचा उपयोग तसा वैद्यकीय क्षेत्रात रोजच्या प्रॅक्टीस मध्ये फारसा नाही .

 

आपल्या भारतीयांपैकी बरेच जण आयुर्वेदावर पूर्ण विश्वास ठेऊन असतात . पण काही जण मात्र संशोधन झालय का असे विचारत असतात.जे फार बारकाईने चिकित्सा करणारे आहेत त्यांच्यासाठी वरचे दोन रंगीत फोटो आहेत.

       बाकी काय दिवाळीला पहाटे उठला असाल तर ती रोजचीसवय लावून घ्या. अभ्यंग केले असेल तर पुढेही चालू ठेवा . वैयक्तिक दिनचर्येचा सल्ला हवा असेल तर तो आयुर्वेद डॉक्टर तुमची प्रकृती तपासून मग नक्की देतील.

          सर्वेSपि सुखीन: संतु .....

डॉ. आनंदी साठये . एम.डी. ( कायचिकित्सा ) 




ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...