मी काय खाऊ ?
मी काय खाऊ हा प्रश्न माणसला बहुतेक आजारी पडल्यावरच पडत असावा. खाणे म्हणजे ऊदरभरण अशी प्राणीमात्रासाठी असलेली नैसर्गिक गरज मानवासाठी मात्र तेवढीच नाही. खाण्याच्या सवयी या मानवाच्या वर्तनातील गुंतागुंतीचा अनेक पैलू असलेला भाग आहे. कारण या सवयींवर जैवरासायनिक , मनोवैज्ञानिक , सांस्कृतिक , भौगोलिक , शैक्षणिक , सामाजिक आर्थिक आणि शारीरिक गोष्टींचा प्रभाव पडत असतो .
पण येवढ्या सगळ्या गोष्टी खाताना का महत्वाच्या ??
जीवनशैलीमुळे होणार्या आजारात किंवा जुनाट आजारात आहारनियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. एखादा डाएटचा पॅटर्न प्रसिद्ध झाला तरी तो सर्वांनाच लागू पडला असे होत नाही.
अगदी एकमेकांच्या विरोधी सूचना असणारे डाएट कोर्सेस यशस्वी होताना आपण पाहातोच आहोत . दोनच वेळा जेवा असे सांगणारा दिक्षित डाएट नी दर दोन तासाने खा असे सांगणारा दिवेकर डाएट ही दोन विरूद्ध ऊदाहरणे आपल्याला सुपरीचित आहेच.
Low carbohydrate diet , low calorie diet , high protein diet , intermittent diet , Mediterranean diet असे असंख्य प्रकार तुम्हाला सापडतील ज्या प्रत्येकाचे evidence based असे संशोधन आहे नी ज्या प्रत्येकाला मर्यादित यश मिळालेलेच आहे. पण मर्यादित यश का ? तर वर म्हटल्याप्रमाणे माणसाच्या खाण्याच्या सवयींवर असंख्य गोष्टिंचा सहभाग असतो.
इथे आयुर्वेदाचे म्हणणे खूप महत्वाचे ठरते. खाण्यापिण्याच्या सवयींवर जितक्या गोष्टींचा प्रभाव पडतो असे वर संगितले आहे त्या सर्व गोष्टींचा विचार आयुर्वेदाने करून ठेवलेला आहे. हा विचार सविस्तर असा “ अष्टौआहार विधी विशेषयातने “ या प्रकरणात वाचायला मिळतो .
तर पाहुयात ही 8 आहार विधी विशेष आयतने नक्की काय आहेत. ?
प्रकृती ,करण , संयोग ,राशि , देश ,काल ,उपयोग संस्था , उपयोक्ता या आठ गोष्टींचा विचार आपण काय खावे हे ठरवताना करायला हवा . इतक्या बारकाईने विचार इतरत्र कोणत्या शास्त्रात क्वचितच केला असेल नाही ?
आता या आठ गोष्टी थोड्या विस्ताराने पाहूयात .
प्रकृती –
येथे प्रकृती म्हणजे आहारीय द्रव्याची प्रकृती असा अर्थ आहे. प्रत्येक आहारीय द्रव्यामध्ये काही गुण असतात उष्ण शीत लघु गुरु रुक्ष स्निग्ध इत्यादी . त्यानुसार त्या आहारीय द्रव्याचा समावेश आपल्या आहारात असावा कि नसावा , किती मात्रेत असावा वगैरे ठरवता येते. उदाहरणार्थ उडीद हे गुरु म्हणजे पचायला जड आहेत तर मुग हे लघु म्हणजे पचायला हलके आहेत . बघा मुग हे आपण आजारपणात नेहमी वापरतो कारण आजारी असताना पचनशक्ती कमी झालेली असते. मिरे , लवंग , दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ प्रकृतीने उष्ण असतात म्हणून पित्त झाल्यावर आपण मसालेदार पदार्थ खाऊ नका असे सांगतो. तर सीताफळ केळ पेरू या फळांची प्रकृती थंड असते म्हणूनच सर्दी खोकला झाल्यावर ही फळे खाऊ नका असे सांगितले जाते. सर्वसामान्यपणे भारतीय लोकांना पारंपारिक रित्या या गोष्टींचे ज्ञान घरातून मिळत असते कि काय पचायला जड आहे काय हलके आहे . काय उष्ण काय थंड आहे. फक्त काही वेळेस या गरम थंड बद्दल काही पदार्थांबद्दल गैरसमजही असतात. ऊदा. दही थंड असते हा एक गैरसमज असून दही प्रत्यक्षात उष्ण असते.( दही ताक याबद्दल नंतर आपण सविस्तर पाहणार आहोतच ). दुसरे म्हणजे पपई बद्दल असाच गैरसमज आहे. ती प्रचंड उष्ण असून गर्भिणीने खाऊ नये असे पारंपारिकरीत्या सांगितले जाते . हे खरे तर ते कच्च्या पपई बद्दल आहे. कच्च्या पपईचा चीक अत्यंत उष्ण असून त्यात मांस पचाविणारी एन्झाइम्स असतात .पिकलेली पपई मात्र पित्तशामक असते. असो.
ही प्रकृती जी उष्ण थंड बघतो ती पदार्थाच्या तापमानावरून नव्हे तर तो पदार्थ शरीरात गेल्यानंतर काय परिणाम दाखवतो त्या वरून असते. मिरे लवंग उष्ण तीक्ष्ण असतात हे आपल्याला तोंडात टाकल्यावर लगेचच समजते तसे.
प्रकृती पदार्थाची बघायची तशी मनुष्याचीही बघावी लागते आहार काय घ्यावा हे ठरवताना. वात पित्त आणि कफ या तीन दोषांच्या संयोगाने ती तयार होत असते. या प्रकृतीनुसार पदार्थ सोसणे न सोसणे घडत असते. या करोना काळात पहिल्या वर्षी खूप लोकांनी वर्षभर कसले कसले काढे घेतले.यातले घटक बघितले तर बहुतेक सारे उष्ण होते. ते नियमित घेऊन पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास व्हायला लागला होता . गुण धर्मांचा विचार न करता तज्ञ व्यक्तीचा वैयक्तिक सल्ला न घेतल्याने असे झाले पण बदनाम मात्र तो काढा झाला .
या नंतर दुसरा घटक आहे करण
करण म्हणजे आहारीय पदार्थावर केले जाणारे संस्कार होय. आपण जे धान्य , डाळी , भाज्या खातो त्यावर काही प्रक्रिया कराव्या लागतात , ते स्वच्छ व्हावे सुपाच्य व्हावे म्हणून. या प्रक्रीयांना संस्कारांना त्यास करण म्हटले आहे. पाण्याने धुणे , पाण्यात भिजवणे , दळणे , भाजणे , आंबवणे वगैरे. गहू तांदूळ डाळी यांवर अग्नी संस्कार केल्याशिवाय आपण पचवूच शकणार नाही , नाही का ?
संस्कारो हि गुणान्तराधानाम असे म्हटले आहे म्हणजे आहारीय पदार्थाचे गुण बदलण्यासाठी हे संस्कार गरजेचे आहेत. तांदूळ भाजून जर भात खाल्ला तर त्याचा वजन वाढवण्याचा गुणधर्म कमी होतो. कोणतेही धान्य भाजल्यानंतर आधी पेक्षा पचायला हलके होते. पण त्यात थोडी रुक्षातही येते. घुसळणे हाही एक संस्कारच आहे. दही हे पचायला जड असते. पण घुसळून त्याचे ताक केल्यावर ते पचायला हलके होते.
करण म्हणजे थोडक्यात अन्न प्रक्रिया , फूड प्रोसेसिंग . पण हल्ली या प्रक्रियांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. प्रक्रिया या त्या पदार्थातले नको असलेले गुण , वाईट परिणाम घालवण्यासाठी केले जातात जात असत. पण हल्ली पदार्थाचा रंग वास घालवून टाकणे , नवीन सुवासिक वास आणणे आकर्षक झुळझुळीत रंग आणणे , पांढरे शुभ्र मऊ दिसणे या साठी प्रक्रिया केल्या जात आहेत त्या आरोग्याला हानी कारक आहेत हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. रीफइंन केलेली पीठे ,तेले हायड्रोजनेटेड तूप ही त्याची काही उदाहरणे आहेत. प्रोसेसिंग च्या अगदी विरुद्ध सगळे कच्चे खा हा सल्लाही पचन प्रक्रिया नाजूक असलेल्या लोकांसाठी चुकीचा आहे.
संयोग
संयोग म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र करून खाणे होय . पदार्थ एकत्र करताना त्यांचा संयोग हा शरीराला हानिकारक असता कामा नये. यासाठी काही पदार्थ एकत्र घेऊ नये असा आयुर्वेद सल्ला देते. अशा अनारोग्यकारक जोड्यांची नावे वाचल्यानंतर तुम्ही कदाचित म्हणाल, ह्या !! त्यात काय आम्ही तर नेहमी खातो हे दोन पदार्थ एकत्र , आम्हाला काहीच झाले नाहीये. एकदा दोनदा एखादा संयोग विरोधी पदार्थ खाऊन लगेच आजार होत नसतो. पण वारंवार खाण्यात आला नी पचनशक्ती मर्यादित असेल तर अशा लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो . याची काही उदाहरणे अशी – तूप आणि मध सम मात्रेत घेऊ नये. मासे आणि दुध , दुध आणि फळे इ.
विरुद्धान्न या नावाखाली आयुर्वेदाने अशी बरीच कॉम्बीनेशन्स सांगितली आहेत जी आरोग्याला घातक असतात.
राशी
राशी म्हणजे प्रमाण .किती प्रमाणात आहार घ्यावा ? आधुनिक शास्त्रात कॅलरी ने आहाराची मात्रा मोजली जाते. नी लहान मुले , स्त्री , पुरुष यांच्यासाठी वेगवेगळी मात्रा मोजली जाते. परंतु आयुर्वेदाने आहाराचे प्रमाण मोजताना वय स्त्री पुरुष याच बरोबर पचन क्षमता आणि आहारीय पदार्थांचे गुणधर्म याचाही विचार करायला सांगितला आहे. ( सर्वग्रह आणि परिग्रह असे दोन शब्द या आहार मात्रेच्या संदर्भात वापरले जातात. सर्वग्रह म्हणजे संपूर्ण आहाराची मात्रा. तर परिग्रह म्हणजे जेवणातल्या प्रत्येक पदार्थाची मात्रा .)
आयुर्वेदात मात्रेच्या संदर्भात असा एक नियम सांगितला आहे की आपल्या अमाशायाचे ४ भाग आहेत अशी कल्पना करून अर्धा भाग घन पदार्थ पाव भाग पातळ पदार्थ आणि पाव भाग रिकामी जागा ठेवावी. याचा अर्थ आयुर्वेदाने पोटभर जेवू नका असेच स्पष्टपणे सांगितले आहे नाही का ? आता प्रत्येकाला आपापल्या पोटाचा अंदाज यायला हवा . आपल्याकडे जेवताना सावकाश होऊ द्या असे म्हणण्याची पद्धत आहे तीचा अर्थ स अवकाश म्हणजे पोटात थोडी जागा ठेवून जेवा असाच आहे.
देश
म्हणजे भौगोलिक भूमी. खाणारा व्यक्ती कुठे जन्माला आला आणि वाढलाय ती त्याची नैसर्गिक भूमी. तसेच आहारीय पदार्थ कोणत्या देशातला आहे ती त्या पदार्थाची भूमी. माती नुसार पदार्थाचे गुणधर्म चव बदलत असते याचा अनुभव आपण नेहमी घेत असतो. कोकणातला हापूस नी इतर ठिकाणाचा हापूस चवीत फरक असतो. साधी वांगी हि भाजी बघितली तरी कृष्णाकाठची वांगी ईतर ठिकाणच्या वांग्यांपेक्षा पटकन शिजतात , त्याला चव असते. प्रत्येक विभागाची खाण्यापिण्याची पद्धती वेगवेगळी असते.जागतिकीकरणामुळे आपल्याला कोणत्याही भागातले पदार्थ कुठेही खाता येतात . पण रोजच्या जेवणासाठी आपण ज्या भागात वाढलो त्या भागातलेच पदार्थ शक्यतो घेतले तर जीवन शैलीचे आजार आटोक्यात ठेवू शकतो. विशेषतः ज्यांची पचनक्षमता मर्यादित आहे जे वारंवार आजारी पडतात त्यांनी या गोष्टीचा बारकाईने विचार करावा. आता देशांतरच केले असेल तर नव्या देशातल्या खाण्यापिण्याच्या सवयी हळू हळू आत्मसात करून घ्याव्या लागतात. या नवीन सवयी लावून घेण्या संदर्भातले पण एक सूत्र आयुर्वेदाने सांगितले आहे. नवीन पदार्थ किंवा नवीन चव शरीराला सवयीची करायची असेल तर तो रोज थोडा थोडा खाऊन त्याची चव याची ओळख करून घ्यावी लागते. या प्रक्रियेला ओकसात्म्य असे म्हणतात. सात्म्य म्हणजे सवयीचे होणे व त्यापासून शरीराला कोणताही त्रास न होणे होय. जो मनुष्य सर्वरस(चवी) सात्म्य असतो त्यास आयुर्वेदाने श्रेष्ठ म्हटले आहे . मधुर , कडू , तिखट , तुरट , खारट , आंबट या सहाही रसाच्या पदार्थांनी कोणताही त्रास न होणे म्हणजे सर्वरस सात्म्य होय. सर्वरस सात्म्य मनुष्य श्रेष्ठ म्हणजे तो आरोग्यपूर्ण असतो. तुम्ही स्वतःमध्ये डोकावून पाहू शकता. नाही हो मला आंबट बिलकुल चालत नाही त्रासच होतो लगेच. किंवा तिखट सहन न होणारेही खूप जण असतात. कोणत्याची चवीचा पदार्थ पचवायची ताकद असेल तर अनारोग्य येईलच का ? लहानपणापासूनच सर्व चवींची सवय लावणे गरजेचे आहे आरोग्यासाठी.
अष्ट विधी विधानांपैकी ५ सांगून झाली उरलेली ३ पुढच्या भागात पाहूया
डॉ. आनंदी साठये
एम.डी ( आयुर्वेद )
धन्यवाद . खूप छान सांगितलं.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाVery simple explanation of Ayurvedic concepts of diet . Good job madam.
उत्तर द्याहटवाThank you very much Doctor
हटवाधन्यवाद खूपच सुंदर माहिती मिळाली
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा