शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

दोष आणि प्रकृती


 दोष – आयुर्वेदातले ( स्वभावातले नव्हे ).आणि प्रकृती – आयुर्वेदातली ( तब्बेत या अर्थी नव्हे )

        डॉक्टर , मागे मी तुम्हाला म्हणालो न , कि मला पोटात वातदोष झालेला , तोच वात आता सरकत सरकत खाली पायापर्यंत पोहोचलाय आणि माझे पाय रात्री खूप दुखतात नि वळवळ करतात. हा वात खाली बोटातून निघून जाईल असे औषध द्या.

हे डॉक्टर आधुनिक शास्त्राचे होते , ते थोडेसे हसून म्हणाले असा पोटातला वात जात नसतो इकडे तिकडे मी तुम्हाला पाय दुखाण्यावर गोळ्या देतो त्या घ्या महिनाभर.  

        आयुर्वेदातल्या वात पित्त कफ या दोषांबद्दल खूप जणांमध्ये गैरसमज असतात आणि मग या गैरसमज युक्त वात पित्ताच्या भाषेत बोलणाऱ्या पेशंटला आधुनिक शास्त्राचे डॉ. मनातल्या मनात हसतात किंवा काही स्मार्ट डॉ. म्हणतात हे वाताचेच इंजेक्शन देतोय तुम्हाला .

         आयुर्वेदातील दोष म्हणजे आपण स्वभावातले दोष दाखवतो तसे नव्हे. तर ते बिघडले असता स्वास्थ्य बिघडते म्हणून त्यांना दोष असे म्हणतात . ते तीन असतात . जसे सृष्टीच्या उत्पत्तीला ब्रह्मा विष्णु महेश या तीन शक्ती कारणीभूत असतात तसेच शरीराची निर्मिती या तीन दोषांपासून झालेली असते. त्यातला वात दोष हा नव निर्मिती आणि क्षय यास करणीभूत असतो. म्हणजे काय तर जिथे जिथे शरीरात अगदी पेशी लेवल पर्यन्त नव निर्मिती , विभाजन किंवा झीज असते ती सर्व वात नावच्या शक्तीमुळे एनर्जी मुळे होत असते . तसेच शरीरात जिथे जिथे पचनाची एका गोष्टीतून दुसर्‍या गोष्टीत रूपांतरची गरज असते ते काम पित्ताचे असते पचन रूपांतर करण्याचे काम उष्णतेशिवाय शक्य नाही. त्यामुळे पित्त म्हणजे उष्मा होय. तिसरा धातू कफ म्हणजे स्थिरता पोषण.

        पूर्ण शरीरात स्थूलापासून सूक्ष्मपर्यंत निर्मिती विभाजन पचन रूपांतर पोषण आणि मग झीज येवढ्याच प्रक्रिया चालू असतात त्या सर्व प्रक्रिया वात पित्त कफामुळे होत असतात. हेच दोष खप कमी खूप जास्त झाले किंवा पार बिघडुन गेले तर त्यांचे काम बिघडून वेगवेगळे रोग निर्माण होतात. मग हे बिघडणे एखाद्या अवयवापुरते मर्यादित असते किंवा सार्वदेहिक असते त्यावरून कोणता रोग निर्माण होणार हे ठरते.

       असे या तीन दोषांबद्दल थोडक्यात सांगता येईल. आता सांगा पोटातला गुडगुड करणारा वात आणि वर सांगितलेला वात याचा तसा काही संबंध आहे का ? आयुर्वेदात ( किंवा संस्कृतमध्ये असेच म्हणूया ) एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो. वात म्हणजे वर सांगितलेला दोष.  मलवायु म्हणजे पचन प्रक्रियेत पोटात तयार होणारा गुडगुडणारा आणि गुदद्वारावाटे बाहेर पडणारा होय. तसेच कफ दोष वेगळा आणि खोकला झाल्यावर तोंडावाटे बाहेर पडणारा कफ ( मळस्वरूप ) वेगळा .

      त्यामुळे शक्यतो कोणता दोष वाढलाय हे आयुर्वेद प्रॅक्टीस करणार्‍या पदवीधर डॉक्टर कडूनच जाणून घ्यावे.

      या तीन दोषांच्या एकत्रीकरणाने आपले शरीर बनलेले असते, ते प्रमाण जन्मत;च असते. पण प्रत्येक शरीरात प्रत्येक दोषाचे प्रमाण वेगवेगळे असते. आणि यावरूनच तुमची प्रकृती ठरत असते. तीनही दोष सम प्रमाणात असणे ही सर्वोत्तम प्रकृती होय , अश्या प्रकृतीची अत्यंत आरोग्यपूर्ण असतात. पण ही तशी दुर्मिळ आहे . समाजात एक दोषज आणि द्विदोषज प्रकृती सापडतात. एक दोषजपेक्षा द्विदोषज प्रकृती हीन दर्जाची असते पण याच प्रकृतीचे लोक हल्ली जास्त सापडतात. वात प्रकृती पित्त प्रकृती कफ प्रकृती , वातपित्त , वात कफ ........या पद्धतीने

     प्रकृतीपरीक्षण  हा आयुर्वेदातला परीक्षणाचा एक सखोल विचार आहे. प्रकृती वरून जणू आपण आपल्या आरोग्याची कुंडली मांडू शकतो. या प्रकृतीवरून पुढे आरोग्यापूर्ण शारीरिक आणि मानसिक  जीवन घालवण्यासाठी तुमचा आहार काय किती कसं असावा , व्यायाम किती कोणता करावा कोणता व्यवसाय शरीराला सूट होईल ईथपासून ते तुमची मानसिकता इथपर्यंतचा सल्ला वैद्य मंडळी देऊ शकतात.

   दोष आणि प्रकृती या बद्दलची ही अगदी प्राथमिक माहिती आहे.

पुढच्या लेखापसून आपण अगदी सोपा रोजच्या जगण्यातला आयुर्वेद बघणार आहोत.

 

डॉ. आनंदी साठये

एम.डी. ( आयुर्वेद ) 

२ टिप्पण्या:

ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...