सोमवार, २६ जून, २०२३

दही थंडगार की गरम ?

 थंडगार दही 


वाचल्यावरही ऊन्हाळ्यात गारेगार वाटले ना ? पण ते फ्रीजमधे ठेवल्याने गारेगार होते प्रत्यक्षात दह्याचा गुणधर्म ऊष्ण असतो. आधुनिक आहारशास्त्रात रोज दही खायला सांगितले आहे. पण आयुर्वेदाने मात्र कधी खावे कुणी खावे कधी खाऊ नये कुणी खाऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याच्यामागची दह्याच्या गुणधर्मानुसार कारणे पण सांगितली आहेत . आपण कारणांच्या खोलात न शिरता आधी हे पाहू कुणी खावे कधी खावे ? 

दही कुणी खावे ? 

▪️नुकतीच सर्दी झालेली असल्यास ( आश्चर्य वाटले ना ? पण जुनाट सर्दी किंवा सायनस असेल तरच खाऊ नये ) 

▪️एक प्रकारचा ताप ज्यात थंडी वाजून येते ( होय या तापात दही खा बिनधास्त ) 

▪️तोंडाची चव गेलेली असेल तर 

▪️मूळव्याधीमधे

▪️जुलाब झालेले असताना

▪️पाळी ऊशीरा किंवा अनेक महीने येतच नसेल तर

▪️गरोदरापणात 4 थ्या महीन्यात

▪️निद्रानाश 

▪️अशक्त पणा बारीकपणा

▪️सतत कुठेतरी दुखणे असणार्या वातविकारांत

होय होय दहीच खायचय वरच्या लोकांनी 


मग दही कुणी खायचं नाही बरं ? 

▪️जाड / स्थूल लोकांनी

▪️सूज येत असल्यास 

▪️कफ झालेला असल्यास 

▪️कुठूनही रक्तस्त्राव होत असताना

▪️त्वचा रोगात 

▪️डायबेटीसमधे

▪️जंत झालेले असतील तर

▪️तोंडात अल्सर्स झाले असतील तर..


बघा डायबेटीस ओबेसिटीत दही नको.


बाकी वरच्या कॕटॕगिरीत नसलेल्या  ऊरलेल्या लोकांनी काय करायचं ? 

त्यांनी शरद ग्रीष्म वसंत रूतू म्हणजे आॉक्टोबर हीट आणि ऊन्हाळा या काळात जरा कमीच खावे. बाकी पावसाळा हिवाळ्यात खावे.

शक्यतो दिवसा खावे रात्री खाऊ नये.

अशक्त बारीक माणसासाठी दही साखर तर टॉनीकवाले पक्वान्न बरं का ? 

या दह्याला टांगून ठेऊन पाणी काढून टाकले की चक्का म्हणतात . चक्का स्वरूपात त्याचे गुणधर्म वेगळे असतात .ते पुढच्या भागात पाहू.

सोमवार, २७ मार्च, २०२३

दुध पोषक की विष

 दुध पोषक की विष



 

30 वर्षांपूर्वी कुणी दुध पिणे आरोग्यदायी आहे  का असे विचारले असते तर एकजात सर्वांनी हो  म्हटले असते.

पण आता दुधाबद्दल ईतकी टोकाची मते तयार झाली आहेत की दूध हे पांढरं विष आहे असे म्हटले जाते. जे दूध लहानपणी पूर्णान्न होते ते मोठेपणी एकदम विषच कसे होईल बरे ? 

आयुर्वेद म्हणतो या जगातल्या प्रत्येक पदार्थात  अगदी विषारी पदार्थातही औषधी गुणधर्म असतात. पण योजकस्तत्र दुर्लभः म्हणजे ते युक्तीने वापरणार्यांची कमतरता असते.

मग आता  ही युक्ती काय ती ऐकूया आणि दुध प्यायचे की नाही ते आपण आपलेच ठरवूया.

आपण जे रोज पितो त्या दुधामधे अर्थात गायीचे दुध श्रेष्ठ आहे. गायीचे दुध पोषक आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत ते पोषणाचे काम करत असते. मात्र हे दुध पचायला जड थंड आणि स्निग्ध गुणाचे असते. म्हणून मग ते कोणी घेऊ नये आणि कोणत्या आजारात घेऊ नये हे आधी बघू मग त्याचे फायदे पाहू.

दूध कधी पिऊ नये  ?

▪️ताप आलेला असताना- पहील्या 7 दिवसात पिऊ नये .

 ▪️भूक लागत नाहीये अशी स्थिती असताना .

▪️अपचन होत असेल तर .

▪️शरीरात कुठेही सूज असेल तर

 ▪️त्वचा विकारांमधे 

▪️पोटदुखी जुलाब होणे.

 ▪️खोकला

 या आजारांमधे दूध प्यायचे नाहीये.


 तसेच संतर्पणजन्य विकारांमधे म्हणजे वजन वाढलेले असताना पण दूध पिऊ नये.  डायबेटीस मधे पण दुध आणि दुधाचे पदार्थ टाळायला सांगितले आहे.


कुणी प्यावे

▪️लहान मुले व कृश बारीक व्यक्ती

▪️गर्भिणी व  बाळंतपणात.

 ▪️एखाद्या आजारपणातल्या अशक्तपणात .

▪️ रक्तस्त्राव होणार्या विकारांमधे 


म्हशीचे दूध हे गायीच्या दुधापेक्षा पचायला  जास्त जड असते. जास्त पोषक असते. त्यामुळे वजन वाढवायचे असेल तसेच रात्री झोपेसाठी म्हशीचे दूध प्यावे. अन्यथा गायीचे दूध केंव्हाही ऊत्तमच.


▪️दूध शक्यतो गरम करून साखर न घालता प्यावे. 

▪️दुधासोबत कोणताही पदार्थ शक्यतो खाऊ नये. विशेषतः आंबट खारट पदार्थ दुधासोबत टाळावेतच. त्यामुळे हल्ली स्वैपाक करताना रेसिपीत दूध घालतात ते चुकीचे आहे. 

▪️दूध व मीठ एकत्र घेऊ नये त्यामुळे दूध पाव दूध बिस्कीट खाणे पूर्णपणे चूक आहे. 

▪️कोणतेही फळ दूधात घालून खाऊ नये. एकाच फळाचा अपवाद. आंबा दूधासोबत चालतो.

▪️दुधाचा थंड कफकर गुणधर्म कमी करण्यासाठी सुंठ आले दालचिनी वगैरे दुधातून घेणे चालते.

आयुर्वेदात दुधातून औषधेही सांगितली आहेत त्याला क्षीरपाक असे म्हणतात. अर्जुनसाल , लसूण , लेंडी पिंपळी , शुंठी वगैरे औषधी द्रव्ये दुधात ऊकळून विशिष्ट आजारात देतात. तसेच काही जलोदरासारख्या आजारात फक्त दूधावर राहाण्याचे ऊपायही सांगितले आहेत. 

या विषयी अधिक माहीती हवी असल्यास क्लिनिक ला फोन करून विचारावे


हल्ली A1 A2 दूध वगैरे गोष्टींची फार चर्चा आहे. ती चर्चा ऊगाचच आपल्या मनातला गोंधळ वाढवाते. सोपं काय ? आपण ज्या भागात वर्षानुवर्षे राहातो त्या भागातले पदार्थ आपल्याला सवयीचे असतात. मग आपल्या देशी गायी आणि म्हशी शेळ्या आणि मेंढ्या आपल्याला सवयीच्या . रोजच्या साठी त्यांचे दूध पिणे केंव्हाही ऊत्तमच.

हार्मोन टोचून व्यवसायासाठी जास्त दूध निर्माण केले जाते जे शरीराला हानिकारक असते पण अलीकडे तोही अवेअरनेस वाढलेला आहे दूधाचा व्यवसाय करणार्यांमधे . तेंव्हा हार्मोनविरहीत दूध प्या. 


ऊंट शेळी मेंढी हत्ती यांच्या दुधात औषधी गुणधर्म असतात ते पुढच्या भागात पाहू. तूर्तास गाय म्हैस शेळी मेंढी यांचे दूध असेल आणि तुम्हाला अतिपोषणाचा कोणताही आजार नसेल तर बिनधास्त दूध प्या. दूध पिताना साय बाजूला काढायला विसरू नका. त्या सायीपासून तयार होणारे तूपही तुम्ही बिनधास्त खाऊ शकताय हे आपण मागच्या तूपाच्या मेसेज मधे वाचलेच असेल.

लोणकढं तूपच खाताय ना तुम्ही ?

 तूप



लोणकढं तूपच खाताय ना तुम्ही ?

 

आपल्या भारतीय जेवणामधे पार हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत जेवणासोबत तूप खायची वर्षानुवर्षांची सवय आहे. 

आहे ? ? कदाचित होती म्हणावी लागेल. कारण कोलेस्टेरॉल नावाचा बागूलबोवा आपल्या मानगुटीवर बसवला गेला ज्यामुळे अनेक जणं भातावर,  पोळीवर तूप घेताना दचकू लागले. आलेल्या हार्ट अटॕकला तूपाला जबाबदार धरून बिना तेलतूपाचे खाताना घरी तूप बनवण्याची परंपरा मोडून बाजारातले सोन्याच्या भावातले आॕलीव आॕईल (तेही व्हर्जिन म्हणजे पहील्या धारेचे असेल तर आजूनच महाग ) वापरायला सुरूवात केली. आॕलीव आॕईल वापरणे म्हणजे तुम्ही स्टॕडर्ड ज्ञानी आहात असे समजले जाऊ लागले. 


तर मंडळी खरोखर तूप ईतके वाईट आहे का ? 


मुळात भारतीय तूप यावर काय संशोधन झालय. ?  तूप वाईट आहे हे कॉर्डीयॉलॉजिस्ट जेंव्हा सांगतात तेंव्हा त्यांच्या पुस्तकातले फॕट विषयीचे संशोधन त्यांच्या डोक्यात असते. क्लॕरीफाईड बटर किंवा प्राणिज स्नेह म्हणून तुपाकडे पाहीले जाते.


पण आपण दही विरजून घुसळून लोणी काढून ते कढवून जे तूप बनवतो तसे तूप भारतीय ऊपखंडा व्यतिरिक्त  कुठे बनवले जात असेल का हा संशोधनाचाच विषय आहे.


आता हे घराघरातलं लोणकढं तूप तेही जर गायीचे असेल तर आयुर्वेदाने सगळ्या फॕट्समधे सर्वोत्तम सांगितले आहे. तेलापेक्षाही. 


तूप हे 'संस्कारस्य अनुवर्तनात' म्हणजे ज्या पदार्थासोबत द्याल त्याचे गुणधर्म वाढवते असे आहे , म्हणूनच आयुर्वेदामधे औषधीयुक्त अशा सिद्ध घृताचा वापर केलेला आहे.


नुसते तूप हे निरोगी माणसाने रोज जरूर खावे. भूक लागत नसेल तर जेवताना मधे थोडे तूप आणि सैंधव एकत्र करून खावे.आजारी माणसाने मात्र खावे की न खावे किती खावे हे वैद्यांच्या सल्ल्याने ठरवावे. कारण सामता असणार्या आजारात तूप नाही असे सांगितले आहे. नी सामता ही वैद्यालाच समजू शकते. 


बर्याचशा कान नाक घश्याच्या रोगांमधे मूळव्याधीमधे स्मरणशक्ती टिकवण्यासाठी म्हणून तूपाची निवळी म्हणजे तूप बनवल्यावर वर जो पातळ भाग राहातो तो , ऊपचार म्हणून सांगितली आहे. 


मात्र हृदयरोग डायबेटीस बिपी वगैरे जीवनशैलीच्या आजारात रोज दोन चमचे गायीचे लोणकढं तूप बिनधास्त खायला हरकत नाही. त्याने कोलेस्टेरॉल वगैरे काही वाढत नाही.


मी तूप खायचे की नाही अशी काहीजणांची शंका असेल तर तुमचा त्रास सांगा ईथेच. डॉक्टर (वैद्य ) स्वतःच येथे मार्गदर्शन करतील . फक्त तूप खावे की नाही हे विचारायला क्लिनिक ला प्रत्यक्ष यायचीही गरज नाही.

9226958538


डाळिंब - हृदयमित्र

 डाळींब - हृदयमित्र



डाळींब आपल्याकडे मुबलक प्रमाणात ऊपलब्ध असते.आयुर्वेदामधे डाळींब हे हृदयासाठी ऊत्तम फळ सांगितले आहे. ( हृद्य ) 

डाळींबावर आतापर्यंत विविध संशोधन झालेले आहे. त्यातूनही हेच सिद्ध केलय 

1. डाळींब हे रक्तवाहीन्यांसाठी प्रोटेक्टीव असे काम करते. म्हणजे ब्लॉकेजेस तयार होण्याच्या सुरूवातीच्या अवस्थेपासूनच काम करते. 

आणि म्हणूनच हृदयरोग्याने रोज डाळींब खावे.

2. डाळींब हे वारंवार लूज मोशन होणे किंवा ईरीटेबल बॉवेल सिंड्रोम यात ऊपयोगी आहे.

3.सूज येणार्या संधीवातातही डाळींब ऊपयोगी पडते. 

4.डाळींबांच्या पानामधे वजन कमी करण्याचा गुणधर्म आहे.

असे बरेच गुण डाळींबात आहेत.

मग काय सुरू करा जेंव्हा मिळेल तेंव्हा डाळींब खायला. हां ..मात्र डाळींब हे गोड आणि आंबट अश्या दोन प्रकारात मिळते. हायपरॲसिडीटी होत असेल तर फक्त आंबट डाळींबखाऊनये.

अन्यथा ताप ,खोकला ,सर्दी, असेल  पोट बिघडले असेल , अपचन असेल , सांधेदुखी असेल हृदयरोग असेल ,बिपी ,डायबेटीस असेल ...सर्वांनी डाळींब खा.

सोलून खा ,रस काढून खा. मात्र रस काढताना साखर मीठ घालू नका. 

ऊपाशी पोटी खा जेवणानंतर खा.

डाळींब खा आरोग्यपूर्ण राहा . 



रविवार, १० जुलै, २०२२

ऊपवास


 उपवास – 

उपवास म्हणजे आयुर्वेदातील लंघनाचाच एक प्रकार आहे. बर्याच रोगांमध्ये लंघन उपयोगी असते . ज्यांना शक्य आहे आणि ज्यांना वैद्यकीय दृष्ट्या  लंघन चालते त्यांनी उपवास कडक करायला हरकत नाही. पण मग बाकीच्यांनी काय खावे बरे ?

आषाढी /कार्तिकी एकादशी , चतुर्थी , असे धार्मिक उपवास बरेच जण करतात.पण मग बरेच वेळा एकादशी दुप्पट खाशी अशी म्हणच खरी करायची वेळ येते. ते होऊ नये म्हणून आपल्याकडे पारंपारिक रित्या जे उपवासाचे पदार्थ आहेत त्यातल्या काही  पदार्थांची माहिती तुम्हाला करून देणार आहे. 


          भगर – याला वरीचे / वरइचे तांदूळ असे म्हणतात. काही भागात तांदुळाच्या भाताऐवजी याचाच भात खातात .याला संस्कृत मध्ये श्यामाक असे म्हटले आहे. भगर पचायला हलकी असते. भगर पित्तकारक असते असा एक गैरसमज आहे. परंतु आयुर्वेदात भगर थंड सांगितली आहे. अति पोषण ( स्थौल्य ) झाल्यानंतर वजन कमी करण्यासाठी जे आहारीय पदार्थ वर्णन केले आहेत त्यात भगरीचा उल्लेख आहे. भगर हि आयुर्वेदात तृणधान्यांमध्ये सर्वोत्तम सांगितली आहे. पचायला हलकी आणि रुक्ष शोषण करणारी असल्याने लंघनाचे सर्व हेतू भगर खाऊन साध्य होतात. त्यामुळे उपवासाला उत्तम . याच कारणाने स्थौल्य आणि डायबेटीस , हृदय विकाराच्या रुग्णांमध्ये  चालणार आहे.


        राजगिरा - याला amaranth म्हणजे ग्रीक भाषेत immortal असे म्हटले आहे. राजगिर्याला रामाचे धान्य असे म्हणतात. राजगिर्याचे पोषण मूल्य ऊच्च दर्जाचे आहे. ग्लुटेन फ्री असून त्यात फॉस्फरस पोटॕशियम कॕलशियम प्रोटीन्स आणि फायबर असतात. आयुर्वेदात राजगिरा पचायला जड सांगितला आहे मात्र त्याच्या लाह्या पचायला हलक्या असतात. राजगिर्याच्या लाह्यांच्या पीठाचे पदार्थ बनवून खावे. डायबेटीस नसेल , वजन प्रमाणात असेल तर आणि लहान मुलांसाठी राजगिर्याचा लाडू हा अत्यंत पोषक पदार्थ समजता येईल. मात्र  ऊपवासाच्या दिवशी हा प्रमाणातच खावा. 


शिंगाडा.

हाही एक ऊपवासातला पदार्थ आहे ज्याला ईंग्रजीत water chestnut असे म्हणतात. हाही अत्यंत पोषक असा पदार्थ आहे . यातही बी व्हीटॕमीन्स पोटॕशियम मॕगेनीज कॉपर रीबोफ्लेविन अशी सूक्ष्म पोषकतत्वे असतात. आयुर्वेदातही हा पोषकच सांगितला आहे. पचायला जड थंड असून ग्राही म्हणजे लूज मोशन होत असताना द्यावयाचा पदार्थ आहे. त्यामुळे खरे तर शिंगाडा ऊपवासाला जपूनच खावा. 

  साबूदाणा या अत्यंत आवडीच्या पदार्थाबद्दल खूप काही लिहीलं बोललं गेलय त्यामुळे त्याची माहीती ईथे मुद्दामच टाळलीय.


ऊपवासाचे पदार्थ असे काही आयुर्वेदात वर्णन नाही. एखादा पदार्थ ऊपवासाला का चालतो नी एखादा का नाही ? खरे तर पचायला हलके पदार्थच फक्त ऊपवासात चालायला हवे. पण असे प्रत्यक्षात दिसत नाही. परंपरेने अनेक पदार्थ ऊपवासाला चालणार्या यादीत हळूहळू समाविष्ट झालेले दिसतात. 

'काय खावे' या पेक्षा ऊपवास 'का करतोय' या हेतूकडे जास्त लक्ष दिले तर काय खावे हा प्रश्न प्रत्येकाला आपल्यापुरता सोडवता येईल.

धार्मिक कारणासाठी ऊपवास करताना तुम्ही आरोग्यपूर्ण असाल तर मग ऊपासाच्या पदार्थांच्या रेसिपी असा भरपूर वाव आहे.

पण धर्मासोबत आरोग्याची आकांक्षा असेल तर कमी सात्विक अन्न  खावे . सात्त्विक आणि हलके या रकान्यात फळे , साय काढलेले दूध ,ताक येवढ्या गोष्टी नक्की बसतात. मग एक दिवस फक्त पातळ पदार्थ आणि फळांवर राहील्यावर किती हलकेपणा येतो ते अनुभवून जरूर बघा. 

बिपी डायबेटीस हृदयविकार असणार्यांनी ऊपवास करू नये असा गैरसमज आधुनिक शास्त्राच्या डॉक्टरांनी ईतका रूजवला आहे की तो मनातून काढता काढता कठीण जाते. हे वरचे रोगी नक्कीच ऊपवास करू शकतात. ऊलट काही वेळेस तर ऊपवासाने सुद्धा रोगाची तीव्रता कमी होते.मात्र योग्य त्या वैद्यांचा सल्ला घेऊनच या प्रकारच्या रूग्णांनी ऊपवास करावा. 

तुम्हाला ऊपवास कसा करायचाय  पण त्याबद्दल मार्गदर्शन हवे असल्यास खालील नंबरवर वाॕट्सप करावे. 

9226958538

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

स्त्रियांमधला हृदयरोग

 

           हृदयरोग आणि स्त्री असे म्हटले की स्त्रियांना सर्वसाधाराणपणे हृदयरोग होत नाही असे म्हटले जाते . हे काही प्रमाणात खरे आहे .ते कसे ?

          ईस्ट्रोजेन हे एक स्त्री विशीष्ठ हार्मोन आहे . या हार्मोनची निर्मिती चाळीशीनंतर हळूहळू कमी होते व मेनोपॉजनंतर (मासिक पाळी गेल्यानंतर )तर अगदीच कमी होते. हे ईस्ट्रोजेन हृदयसंरक्षक समजले जाते . खर तर याचं काम या बाबतीत नक्की कसं चालतं हे पूर्णपणे समजलेले नाहीये , पण LDL हे हृदयासाठी वाईट समजले जाणारे कोलेस्टेरॉल इस्ट्रोजेनमुळे नियंत्रणात राहाते . इस्ट्रोजेनमुळे रक्तवाहीनीचे आतले अस्तर ( endothelium) याचे स्वास्थ्य ईस्ट्रोजेनमुळे टिकून राहाते . त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहीन्यांचा आजार (blockages ) अडथळे निर्माण होत नाहीत . आता पाळी गेल्यावर रक्तवाहिन्यांचे हे संरक्षण नाहीसे होते आणि हृदय रोगाची शक्यता स्त्रियांना पुरुषाएवढीच वाढते .

              दुसरं असं की वैद्यकीय जगतात जे हृदय रोगावर संशोधन झाले ते नाईलाजाने पुरुषप्रधान होते . म्हणजे संशोधनासाठी जे स्वयंसेवक येत असत ते जास्त प्रमाणात पुरूष असतं (सामाजिक मर्यादेमुळे ) त्यामुळे फक्त स्त्रियांचा संशोधनासाठी असा विचार केला गेला तो जे खास स्त्रियांचे आजार असतात त्यासाठीच . स्त्रियांच्या रक्तदाब मधुमेह हृदयरोग याबाबतीत  वेगळा डेटा अनेक वर्षे नव्हताच. अलीकडे अशी स्त्रियांबाबत माहिती गोळा केली जाऊ लागली .

     आपण वर पहिले की मेनोपॉज नंतर स्त्रियांना नी पुरुषांना सारख्याच प्रमाणात हृदयरोगाची शक्यता असते .

मात्र स्त्रियांचा हृदयरोग थोडा वेगळ्या स्वरूपात होते .

1   अंजायनाचा ( चालल्यानंतर छातीत दुखणे ) त्रास झाल्यानंतर angiography केली तर Non Obstructing Coronary Disease चे प्रमाण स्त्रियांमधे जास्त सापडते . (म्हणजे ब्लॉकेजेसचे प्रमाण 60% पेक्षा कमी असते )

2     
 तसेच चालल्यावर दम लागणार्या आणि हार्ट फेल्युअरची लक्षणे असणार्या स्त्रियांची हृदयाची सोनोग्राफी केली (2d echo ) तर हृदयाची पंपिंग क्षमता मात्र नॉर्मल सापडते , याला वैद्यकीय भाषेत heart failure with preserved ejection fraction असे म्हटले जाते .

    त्रास होतोय हार्ट फेल्युयर आहे पण अशा स्त्रीचे रिपोर्ट असे जवळजवळ नॉर्मल  आल्यानंतर बरेचदा ट्रीटमेंट कडे गांभिर्याने पाहीले जात नाही कधी कधी डॉक्टर सुद्धा ६०% पेक्षा  कमी ब्लॉकेजेस आहेत म्हटल्यावर बाकी काहीच बोलत नाही .त्यामुळे स्त्रियांच्या हृदयरोगाकडे दुर्लक्ष केले जाते  पण अशा वेळेस जीवनशैली सुधारणा तातडीने केली पाहीजे. हृदयरोग झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून जास्त काळजी घेतली पाहीजे . मग असा काही आरोग्याचा मापदंड आहे का की तो लाऊन आपले हृदयाचे आरोग्य किती चांगले आहे किंवा किती धोक्यात आहे ? हे कसे तपासता येईल ? हो.  त्या निमित्ताने खास स्त्रियांवर झालेल्या संशोधनाचा आढावा सांगणं खूप महत्त्वाचे वाटतय .

             शिकागो युनिव्हर्सिटीत एक सेंट जेम्स टेक हार्ट नावाचा एक प्रोजेक्ट राबवला गेला . त्यात ५० शीच्या आसपासच्या 5721 स्त्रियांनी भाग घेतला . नी पुढे आठ वर्षे या स्त्रियांच्या आरोग्याचा पाठपुरावा केला गेला . त्यातल्या एकदोनच महत्त्वाच्या गोष्टी मी येथे नमूद करते. या सर्व स्त्रियांची व्यायामक्षमता मेट (MET ) मधे मोजली . म्हणजेच त्यांची स्ट्रेस टेस्ट केली( ट्रेडमिल टेस्ट ) . या सर्व स्त्रियांना कोणताही त्रास होत नव्हता. तेंव्हा खालील गोष्टी लक्षात आल्या.

ज्या स्त्रियांची व्यायामक्षमता 8 मेट आणि त्यापेक्षा जास्त होती त्यांच्यामधला पुढच्या 8 वर्षातला मृत्यूदर सगळ्या कमी होता .

ज्या स्त्रियांची व्यायामक्षमता 5 मेटपेक्षा कमी होती त्यांच्यात पुढच्या 8 वर्षातला मृत्यूदर सगळ्यात जास्त होता .

तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मधुमेह ऊच्चरक्तदाब वाढलेलं वजन वाढलेलं कोलेस्टेरॉल ही  हृदयरोगाची कारणे आहेत . पण हे आजार  असणार्या स्त्रिची व्यायामक्षमता जर 8 मेट असेल तरीही तीचा धोका कमी असतो . म्हणजे तुमची मेट ची क्षमता हा तुमच्या हृदयाच्या आरोग्याचा मापदंडच झाला .

    मग या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर  असे वाटते की ४० नंतरच्या प्रत्येक स्त्रीने ही स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी 8 मेटच्या खाली क्षमता असणार्या स्त्रीयांनी डॉक्टरांच्या मदतीने त्याची कारणे शोधावी आणि त्या कारणांवर काम करावे ( कारणे - व्यायामाचा अभाव ,वाढलेलं वजन , हीमोग्लोबीन कमी असणे, उच्चरक्तदाब व रक्तातली साखर बराच काळ वाढलेली असणे )

   आज स्त्री दिनानिमित्त आपला हृदयाच्या आरोग्याचा मापदंड  जागेवर आहे की नाही हे तपासून पहावा . आणि तो जर 8 मेट पेक्षा कमी असेल तर वैद्यकीय सल्ल्याने त्याची करणे शोधून ती दूर करावीत. ही मेट मधली क्षमता ट्रेडमिल टेस्ट करून कळते.

धन्यवाद

डॉ. आनंदी साठये

B.A.M.S, M.D.

8975394110

 

 

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

मी काय खाऊ ?


मी काय खाऊ ? 

             मी काय खाऊ हा प्रश्न माणसला बहुतेक आजारी पडल्यावरच पडत असावा. खाणे म्हणजे ऊदरभरण अशी प्राणीमात्रासाठी असलेली नैसर्गिक गरज मानवासाठी मात्र तेवढीच नाही. खाण्याच्या सवयी या मानवाच्या वर्तनातील गुंतागुंतीचा अनेक पैलू  असलेला भाग आहे. कारण या सवयींवर जैवरासायनिक , मनोवैज्ञानिक , सांस्कृतिक , भौगोलिक , शैक्षणिक , सामाजिक आर्थिक आणि शारीरिक गोष्टींचा प्रभाव पडत असतो . 

पण येवढ्या सगळ्या गोष्टी खाताना का महत्वाच्या ?? 

         जीवनशैलीमुळे होणार्या आजारात किंवा जुनाट आजारात आहारनियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. एखादा डाएटचा पॅटर्न प्रसिद्ध झाला तरी तो सर्वांनाच लागू पडला असे होत नाही.

          अगदी एकमेकांच्या विरोधी सूचना असणारे डाएट कोर्सेस यशस्वी होताना आपण पाहातोच आहोत . दोनच वेळा जेवा असे सांगणारा दिक्षित डाएट नी दर दोन तासाने खा असे सांगणारा दिवेकर डाएट ही दोन विरूद्ध ऊदाहरणे आपल्याला सुपरीचित आहेच.

           Low carbohydrate diet , low calorie diet , high protein diet , intermittent diet , Mediterranean diet असे असंख्य प्रकार तुम्हाला सापडतील ज्या प्रत्येकाचे evidence based असे संशोधन आहे नी ज्या प्रत्येकाला मर्यादित यश मिळालेलेच आहे. पण मर्यादित यश का ? तर वर म्हटल्याप्रमाणे माणसाच्या खाण्याच्या सवयींवर असंख्य गोष्टिंचा सहभाग असतो. 

        इथे आयुर्वेदाचे म्हणणे खूप महत्वाचे ठरते. खाण्यापिण्याच्या सवयींवर जितक्या गोष्टींचा प्रभाव पडतो असे वर संगितले आहे त्या सर्व गोष्टींचा विचार आयुर्वेदाने करून ठेवलेला आहे. हा विचार सविस्तर असा “ अष्टौआहार विधी विशेषयातने “ या प्रकरणात वाचायला मिळतो .

तर पाहुयात ही 8 आहार विधी विशेष आयतने नक्की  काय  आहेत. ?

प्रकृती ,करण , संयोग ,राशि , देश ,काल ,उपयोग संस्था , उपयोक्ता या आठ गोष्टींचा विचार आपण काय खावे हे ठरवताना करायला हवा . इतक्या बारकाईने विचार इतरत्र कोणत्या शास्त्रात क्वचितच केला असेल नाही ? 

आता या आठ गोष्टी थोड्या विस्ताराने पाहूयात .

प्रकृती – 

येथे प्रकृती म्हणजे आहारीय द्रव्याची प्रकृती असा अर्थ आहे. प्रत्येक आहारीय द्रव्यामध्ये काही गुण असतात उष्ण शीत लघु गुरु रुक्ष स्निग्ध इत्यादी . त्यानुसार त्या आहारीय द्रव्याचा समावेश आपल्या आहारात असावा कि नसावा ,  किती मात्रेत असावा वगैरे ठरवता येते. उदाहरणार्थ उडीद हे गुरु म्हणजे पचायला जड आहेत तर मुग हे लघु म्हणजे पचायला हलके आहेत . बघा मुग हे आपण आजारपणात नेहमी वापरतो कारण आजारी असताना पचनशक्ती कमी झालेली असते. मिरे , लवंग , दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ प्रकृतीने उष्ण असतात म्हणून पित्त झाल्यावर आपण मसालेदार पदार्थ खाऊ नका असे सांगतो. तर सीताफळ केळ पेरू या फळांची प्रकृती थंड असते म्हणूनच सर्दी खोकला झाल्यावर ही फळे खाऊ नका असे सांगितले जाते. सर्वसामान्यपणे भारतीय लोकांना पारंपारिक रित्या या गोष्टींचे ज्ञान घरातून मिळत असते कि काय पचायला जड आहे काय हलके आहे . काय उष्ण काय थंड आहे. फक्त काही वेळेस या गरम थंड बद्दल काही पदार्थांबद्दल गैरसमजही असतात. ऊदा. दही थंड असते हा एक गैरसमज असून दही प्रत्यक्षात  उष्ण असते.( दही ताक याबद्दल नंतर आपण सविस्तर पाहणार आहोतच ). दुसरे म्हणजे पपई बद्दल असाच गैरसमज आहे. ती प्रचंड उष्ण असून गर्भिणीने खाऊ नये असे पारंपारिकरीत्या सांगितले जाते . हे खरे तर ते कच्च्या पपई बद्दल आहे. कच्च्या पपईचा चीक अत्यंत उष्ण असून त्यात मांस पचाविणारी एन्झाइम्स असतात .पिकलेली पपई मात्र पित्तशामक असते. असो.

      ही प्रकृती जी उष्ण थंड बघतो ती पदार्थाच्या तापमानावरून नव्हे तर तो पदार्थ शरीरात गेल्यानंतर काय परिणाम दाखवतो त्या वरून असते. मिरे लवंग उष्ण तीक्ष्ण असतात हे आपल्याला तोंडात टाकल्यावर लगेचच समजते तसे. 

        प्रकृती पदार्थाची बघायची तशी मनुष्याचीही बघावी लागते आहार काय घ्यावा हे ठरवताना. वात पित्त आणि कफ या तीन दोषांच्या संयोगाने ती तयार होत असते. या प्रकृतीनुसार पदार्थ सोसणे न सोसणे घडत असते. या करोना काळात पहिल्या वर्षी खूप लोकांनी वर्षभर कसले कसले काढे घेतले.यातले घटक बघितले तर बहुतेक सारे उष्ण होते. ते नियमित घेऊन पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास व्हायला लागला होता . गुण धर्मांचा विचार न करता तज्ञ व्यक्तीचा वैयक्तिक सल्ला न घेतल्याने असे झाले पण बदनाम मात्र तो काढा झाला .


      या नंतर दुसरा घटक आहे करण 

 करण म्हणजे आहारीय पदार्थावर केले जाणारे संस्कार होय. आपण जे धान्य , डाळी , भाज्या खातो त्यावर काही प्रक्रिया कराव्या लागतात , ते स्वच्छ  व्हावे सुपाच्य व्हावे म्हणून. या प्रक्रीयांना संस्कारांना त्यास करण म्हटले आहे. पाण्याने धुणे , पाण्यात भिजवणे , दळणे , भाजणे , आंबवणे वगैरे. गहू तांदूळ डाळी  यांवर अग्नी संस्कार केल्याशिवाय आपण पचवूच शकणार नाही , नाही का ? 

संस्कारो हि गुणान्तराधानाम असे म्हटले आहे म्हणजे आहारीय पदार्थाचे गुण बदलण्यासाठी हे संस्कार गरजेचे आहेत. तांदूळ भाजून जर भात खाल्ला तर त्याचा वजन वाढवण्याचा गुणधर्म कमी होतो. कोणतेही धान्य भाजल्यानंतर आधी पेक्षा पचायला हलके होते. पण त्यात थोडी रुक्षातही येते. घुसळणे हाही एक संस्कारच आहे. दही हे पचायला जड असते. पण घुसळून त्याचे ताक केल्यावर ते पचायला हलके होते. 

  करण म्हणजे थोडक्यात अन्न प्रक्रिया , फूड प्रोसेसिंग . पण हल्ली या प्रक्रियांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. प्रक्रिया या त्या पदार्थातले नको असलेले गुण , वाईट परिणाम घालवण्यासाठी केले जातात जात असत. पण हल्ली पदार्थाचा रंग वास घालवून टाकणे , नवीन सुवासिक वास आणणे आकर्षक झुळझुळीत रंग आणणे , पांढरे शुभ्र मऊ दिसणे या साठी प्रक्रिया केल्या जात आहेत त्या आरोग्याला हानी कारक आहेत हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. रीफइंन केलेली पीठे ,तेले हायड्रोजनेटेड तूप ही त्याची काही उदाहरणे आहेत. प्रोसेसिंग च्या अगदी विरुद्ध सगळे कच्चे खा हा सल्लाही पचन प्रक्रिया नाजूक असलेल्या लोकांसाठी चुकीचा आहे. 


संयोग 

 संयोग म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र करून खाणे होय . पदार्थ एकत्र करताना त्यांचा संयोग हा शरीराला हानिकारक असता कामा नये. यासाठी काही पदार्थ एकत्र घेऊ नये असा आयुर्वेद सल्ला देते. अशा अनारोग्यकारक जोड्यांची नावे वाचल्यानंतर तुम्ही कदाचित म्हणाल,  ह्या !! त्यात काय आम्ही तर नेहमी खातो हे दोन पदार्थ एकत्र , आम्हाला काहीच झाले नाहीये. एकदा दोनदा एखादा संयोग विरोधी पदार्थ खाऊन लगेच आजार होत नसतो. पण वारंवार खाण्यात आला नी पचनशक्ती मर्यादित असेल तर अशा लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो . याची काही उदाहरणे अशी – तूप आणि मध सम मात्रेत घेऊ नये. मासे आणि दुध , दुध आणि फळे इ. 

विरुद्धान्न या नावाखाली आयुर्वेदाने अशी बरीच कॉम्बीनेशन्स सांगितली आहेत जी आरोग्याला घातक असतात. 

राशी

राशी म्हणजे प्रमाण .किती प्रमाणात आहार घ्यावा ? आधुनिक शास्त्रात कॅलरी ने आहाराची मात्रा मोजली जाते. नी लहान मुले , स्त्री , पुरुष यांच्यासाठी  वेगवेगळी मात्रा मोजली जाते. परंतु आयुर्वेदाने आहाराचे प्रमाण  मोजताना वय स्त्री पुरुष याच बरोबर पचन क्षमता आणि आहारीय पदार्थांचे गुणधर्म याचाही विचार करायला सांगितला आहे. ( सर्वग्रह  आणि परिग्रह असे दोन शब्द या आहार मात्रेच्या संदर्भात वापरले जातात. सर्वग्रह म्हणजे संपूर्ण आहाराची मात्रा. तर परिग्रह म्हणजे जेवणातल्या प्रत्येक पदार्थाची मात्रा .) 

 आयुर्वेदात मात्रेच्या संदर्भात असा एक नियम सांगितला आहे की आपल्या अमाशायाचे ४ भाग आहेत अशी कल्पना करून अर्धा भाग घन पदार्थ पाव भाग पातळ पदार्थ आणि पाव भाग रिकामी जागा ठेवावी. याचा अर्थ आयुर्वेदाने पोटभर जेवू नका असेच स्पष्टपणे सांगितले आहे नाही का ? आता प्रत्येकाला आपापल्या पोटाचा अंदाज यायला हवा . आपल्याकडे जेवताना सावकाश होऊ द्या असे म्हणण्याची पद्धत आहे तीचा अर्थ स अवकाश म्हणजे पोटात थोडी जागा ठेवून जेवा असाच आहे. 


देश 

 म्हणजे भौगोलिक भूमी. खाणारा व्यक्ती कुठे जन्माला आला आणि वाढलाय ती त्याची नैसर्गिक भूमी. तसेच आहारीय पदार्थ कोणत्या देशातला आहे ती त्या पदार्थाची भूमी. माती नुसार पदार्थाचे गुणधर्म चव बदलत असते याचा अनुभव आपण नेहमी घेत असतो. कोकणातला हापूस नी इतर ठिकाणाचा हापूस चवीत फरक असतो. साधी वांगी हि भाजी बघितली तरी कृष्णाकाठची वांगी ईतर ठिकाणच्या वांग्यांपेक्षा पटकन शिजतात , त्याला चव असते. प्रत्येक विभागाची खाण्यापिण्याची पद्धती वेगवेगळी असते.जागतिकीकरणामुळे आपल्याला कोणत्याही भागातले पदार्थ कुठेही खाता येतात . पण रोजच्या जेवणासाठी आपण ज्या भागात वाढलो त्या भागातलेच पदार्थ शक्यतो घेतले तर जीवन शैलीचे आजार आटोक्यात ठेवू शकतो. विशेषतः ज्यांची पचनक्षमता मर्यादित आहे जे वारंवार आजारी पडतात त्यांनी या गोष्टीचा बारकाईने विचार करावा. आता देशांतरच केले असेल तर नव्या देशातल्या खाण्यापिण्याच्या सवयी हळू हळू आत्मसात  करून घ्याव्या लागतात.  या नवीन सवयी लावून घेण्या संदर्भातले पण एक सूत्र आयुर्वेदाने सांगितले आहे. नवीन पदार्थ किंवा नवीन चव शरीराला सवयीची करायची असेल तर तो रोज थोडा थोडा खाऊन त्याची चव याची ओळख करून घ्यावी लागते. या प्रक्रियेला ओकसात्म्य असे म्हणतात. सात्म्य म्हणजे सवयीचे होणे व त्यापासून शरीराला कोणताही त्रास न होणे होय.  जो मनुष्य सर्वरस(चवी) सात्म्य असतो त्यास आयुर्वेदाने श्रेष्ठ म्हटले आहे . मधुर , कडू , तिखट , तुरट , खारट , आंबट या सहाही रसाच्या पदार्थांनी कोणताही त्रास न होणे म्हणजे सर्वरस सात्म्य होय. सर्वरस सात्म्य मनुष्य श्रेष्ठ म्हणजे तो आरोग्यपूर्ण असतो. तुम्ही स्वतःमध्ये डोकावून पाहू शकता. नाही हो मला आंबट बिलकुल चालत नाही त्रासच होतो लगेच. किंवा तिखट सहन न होणारेही खूप जण असतात. कोणत्याची चवीचा पदार्थ पचवायची ताकद असेल तर अनारोग्य येईलच का ? लहानपणापासूनच सर्व चवींची सवय लावणे गरजेचे आहे आरोग्यासाठी.


अष्ट विधी विधानांपैकी ५ सांगून झाली उरलेली ३ पुढच्या भागात पाहूया 


डॉ. आनंदी साठये 

एम.डी ( आयुर्वेद )

ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...