सोमवार, २६ जून, २०२३

ताक पृथ्वीवरचे अमृत

तक्रं शक्रस्य दुर्लभम् - ईंद्राला दुर्लभ असे ताक पृथ्वीवरच्या मर्त्य मानवासाठी मात्र अमृताप्रमाणे आहे. 

आयुर्वेदाने दही रोज खाऊ नये असे म्हटले आहे . पण त्याच दह्यापासून बनवलेले ताक मात्र तुम्ही सकाळ संध्याकाळ प्यायले तरी चांगले आहे. कारण दह्यामधे दुप्पट पाणी घालून घुसळण्यामुळे ते पचायला हलके होते. 

ताक जेवणाच्या आधी नंतर कसेही प्यायले तरी चालते. फक्त ते किंचित आंबट असल्याने पित्त झालेले असताना आणि दुपारी पिऊ नये.


*ताक कुणी प्यावे*

 

सर्व स्त्री पुरूष आबालवृद्ध 


*कोणत्या आजारपणात ताक चालते ?* 

शरीरावर सूज येणे 

जलोदर 

मूळव्याध 

तोंडाला चव नसणे 

ग्रहणी किंवा IBS 

अपचन

वातविकार

रक्त कमी असणे (anemia )


*ताक केंव्हा पिऊ नये* 

पित्त झालेले असताना

जखमी अवस्थेत

अशक्तपणा आलेला असताना

चक्कर येत असताना


हिवाळ्यात पावसाळ्यात रोज प्यावे . ऊन्हाळ्यात कमी प्यावे. ताक हे थंडगार नसून ते ऊष्ण असते. त्यामुळेच ते पचनाला मदत करते. 


आधुनिक आहारशास्त्रानुसार एक कपभर ताकात (245 ml ) जवळजवळ 8 ग्रॕम प्रोटीन असते. Vit D कॕलशियम आणि पोटॕशियमही असते. 


आणि म्हणूनच ऊपासाच्या दिवशी फक्त ताक प्यायले तरी चालते. किंबहुना वजन कमी करताना फक्त ताक पिऊन लंघन करण्याचा फायदा होतो. 


ईंद्राला न मिळणारे ताक रोज प्या आणि आरोग्याच्या स्वर्गसुखाचा लाभ घ्या 

@नाशिकमाधवबाग

आरोग्यासाठी संपर्क

9226958538

दही थंडगार की गरम ?

 थंडगार दही 


वाचल्यावरही ऊन्हाळ्यात गारेगार वाटले ना ? पण ते फ्रीजमधे ठेवल्याने गारेगार होते प्रत्यक्षात दह्याचा गुणधर्म ऊष्ण असतो. आधुनिक आहारशास्त्रात रोज दही खायला सांगितले आहे. पण आयुर्वेदाने मात्र कधी खावे कुणी खावे कधी खाऊ नये कुणी खाऊ नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याच्यामागची दह्याच्या गुणधर्मानुसार कारणे पण सांगितली आहेत . आपण कारणांच्या खोलात न शिरता आधी हे पाहू कुणी खावे कधी खावे ? 

दही कुणी खावे ? 

▪️नुकतीच सर्दी झालेली असल्यास ( आश्चर्य वाटले ना ? पण जुनाट सर्दी किंवा सायनस असेल तरच खाऊ नये ) 

▪️एक प्रकारचा ताप ज्यात थंडी वाजून येते ( होय या तापात दही खा बिनधास्त ) 

▪️तोंडाची चव गेलेली असेल तर 

▪️मूळव्याधीमधे

▪️जुलाब झालेले असताना

▪️पाळी ऊशीरा किंवा अनेक महीने येतच नसेल तर

▪️गरोदरापणात 4 थ्या महीन्यात

▪️निद्रानाश 

▪️अशक्त पणा बारीकपणा

▪️सतत कुठेतरी दुखणे असणार्या वातविकारांत

होय होय दहीच खायचय वरच्या लोकांनी 


मग दही कुणी खायचं नाही बरं ? 

▪️जाड / स्थूल लोकांनी

▪️सूज येत असल्यास 

▪️कफ झालेला असल्यास 

▪️कुठूनही रक्तस्त्राव होत असताना

▪️त्वचा रोगात 

▪️डायबेटीसमधे

▪️जंत झालेले असतील तर

▪️तोंडात अल्सर्स झाले असतील तर..


बघा डायबेटीस ओबेसिटीत दही नको.


बाकी वरच्या कॕटॕगिरीत नसलेल्या  ऊरलेल्या लोकांनी काय करायचं ? 

त्यांनी शरद ग्रीष्म वसंत रूतू म्हणजे आॉक्टोबर हीट आणि ऊन्हाळा या काळात जरा कमीच खावे. बाकी पावसाळा हिवाळ्यात खावे.

शक्यतो दिवसा खावे रात्री खाऊ नये.

अशक्त बारीक माणसासाठी दही साखर तर टॉनीकवाले पक्वान्न बरं का ? 

या दह्याला टांगून ठेऊन पाणी काढून टाकले की चक्का म्हणतात . चक्का स्वरूपात त्याचे गुणधर्म वेगळे असतात .ते पुढच्या भागात पाहू.

सोमवार, २७ मार्च, २०२३

दुध पोषक की विष

 दुध पोषक की विष



 

30 वर्षांपूर्वी कुणी दुध पिणे आरोग्यदायी आहे  का असे विचारले असते तर एकजात सर्वांनी हो  म्हटले असते.

पण आता दुधाबद्दल ईतकी टोकाची मते तयार झाली आहेत की दूध हे पांढरं विष आहे असे म्हटले जाते. जे दूध लहानपणी पूर्णान्न होते ते मोठेपणी एकदम विषच कसे होईल बरे ? 

आयुर्वेद म्हणतो या जगातल्या प्रत्येक पदार्थात  अगदी विषारी पदार्थातही औषधी गुणधर्म असतात. पण योजकस्तत्र दुर्लभः म्हणजे ते युक्तीने वापरणार्यांची कमतरता असते.

मग आता  ही युक्ती काय ती ऐकूया आणि दुध प्यायचे की नाही ते आपण आपलेच ठरवूया.

आपण जे रोज पितो त्या दुधामधे अर्थात गायीचे दुध श्रेष्ठ आहे. गायीचे दुध पोषक आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत ते पोषणाचे काम करत असते. मात्र हे दुध पचायला जड थंड आणि स्निग्ध गुणाचे असते. म्हणून मग ते कोणी घेऊ नये आणि कोणत्या आजारात घेऊ नये हे आधी बघू मग त्याचे फायदे पाहू.

दूध कधी पिऊ नये  ?

▪️ताप आलेला असताना- पहील्या 7 दिवसात पिऊ नये .

 ▪️भूक लागत नाहीये अशी स्थिती असताना .

▪️अपचन होत असेल तर .

▪️शरीरात कुठेही सूज असेल तर

 ▪️त्वचा विकारांमधे 

▪️पोटदुखी जुलाब होणे.

 ▪️खोकला

 या आजारांमधे दूध प्यायचे नाहीये.


 तसेच संतर्पणजन्य विकारांमधे म्हणजे वजन वाढलेले असताना पण दूध पिऊ नये.  डायबेटीस मधे पण दुध आणि दुधाचे पदार्थ टाळायला सांगितले आहे.


कुणी प्यावे

▪️लहान मुले व कृश बारीक व्यक्ती

▪️गर्भिणी व  बाळंतपणात.

 ▪️एखाद्या आजारपणातल्या अशक्तपणात .

▪️ रक्तस्त्राव होणार्या विकारांमधे 


म्हशीचे दूध हे गायीच्या दुधापेक्षा पचायला  जास्त जड असते. जास्त पोषक असते. त्यामुळे वजन वाढवायचे असेल तसेच रात्री झोपेसाठी म्हशीचे दूध प्यावे. अन्यथा गायीचे दूध केंव्हाही ऊत्तमच.


▪️दूध शक्यतो गरम करून साखर न घालता प्यावे. 

▪️दुधासोबत कोणताही पदार्थ शक्यतो खाऊ नये. विशेषतः आंबट खारट पदार्थ दुधासोबत टाळावेतच. त्यामुळे हल्ली स्वैपाक करताना रेसिपीत दूध घालतात ते चुकीचे आहे. 

▪️दूध व मीठ एकत्र घेऊ नये त्यामुळे दूध पाव दूध बिस्कीट खाणे पूर्णपणे चूक आहे. 

▪️कोणतेही फळ दूधात घालून खाऊ नये. एकाच फळाचा अपवाद. आंबा दूधासोबत चालतो.

▪️दुधाचा थंड कफकर गुणधर्म कमी करण्यासाठी सुंठ आले दालचिनी वगैरे दुधातून घेणे चालते.

आयुर्वेदात दुधातून औषधेही सांगितली आहेत त्याला क्षीरपाक असे म्हणतात. अर्जुनसाल , लसूण , लेंडी पिंपळी , शुंठी वगैरे औषधी द्रव्ये दुधात ऊकळून विशिष्ट आजारात देतात. तसेच काही जलोदरासारख्या आजारात फक्त दूधावर राहाण्याचे ऊपायही सांगितले आहेत. 

या विषयी अधिक माहीती हवी असल्यास क्लिनिक ला फोन करून विचारावे


हल्ली A1 A2 दूध वगैरे गोष्टींची फार चर्चा आहे. ती चर्चा ऊगाचच आपल्या मनातला गोंधळ वाढवाते. सोपं काय ? आपण ज्या भागात वर्षानुवर्षे राहातो त्या भागातले पदार्थ आपल्याला सवयीचे असतात. मग आपल्या देशी गायी आणि म्हशी शेळ्या आणि मेंढ्या आपल्याला सवयीच्या . रोजच्या साठी त्यांचे दूध पिणे केंव्हाही ऊत्तमच.

हार्मोन टोचून व्यवसायासाठी जास्त दूध निर्माण केले जाते जे शरीराला हानिकारक असते पण अलीकडे तोही अवेअरनेस वाढलेला आहे दूधाचा व्यवसाय करणार्यांमधे . तेंव्हा हार्मोनविरहीत दूध प्या. 


ऊंट शेळी मेंढी हत्ती यांच्या दुधात औषधी गुणधर्म असतात ते पुढच्या भागात पाहू. तूर्तास गाय म्हैस शेळी मेंढी यांचे दूध असेल आणि तुम्हाला अतिपोषणाचा कोणताही आजार नसेल तर बिनधास्त दूध प्या. दूध पिताना साय बाजूला काढायला विसरू नका. त्या सायीपासून तयार होणारे तूपही तुम्ही बिनधास्त खाऊ शकताय हे आपण मागच्या तूपाच्या मेसेज मधे वाचलेच असेल.

लोणकढं तूपच खाताय ना तुम्ही ?

 तूप



लोणकढं तूपच खाताय ना तुम्ही ?

 

आपल्या भारतीय जेवणामधे पार हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत जेवणासोबत तूप खायची वर्षानुवर्षांची सवय आहे. 

आहे ? ? कदाचित होती म्हणावी लागेल. कारण कोलेस्टेरॉल नावाचा बागूलबोवा आपल्या मानगुटीवर बसवला गेला ज्यामुळे अनेक जणं भातावर,  पोळीवर तूप घेताना दचकू लागले. आलेल्या हार्ट अटॕकला तूपाला जबाबदार धरून बिना तेलतूपाचे खाताना घरी तूप बनवण्याची परंपरा मोडून बाजारातले सोन्याच्या भावातले आॕलीव आॕईल (तेही व्हर्जिन म्हणजे पहील्या धारेचे असेल तर आजूनच महाग ) वापरायला सुरूवात केली. आॕलीव आॕईल वापरणे म्हणजे तुम्ही स्टॕडर्ड ज्ञानी आहात असे समजले जाऊ लागले. 


तर मंडळी खरोखर तूप ईतके वाईट आहे का ? 


मुळात भारतीय तूप यावर काय संशोधन झालय. ?  तूप वाईट आहे हे कॉर्डीयॉलॉजिस्ट जेंव्हा सांगतात तेंव्हा त्यांच्या पुस्तकातले फॕट विषयीचे संशोधन त्यांच्या डोक्यात असते. क्लॕरीफाईड बटर किंवा प्राणिज स्नेह म्हणून तुपाकडे पाहीले जाते.


पण आपण दही विरजून घुसळून लोणी काढून ते कढवून जे तूप बनवतो तसे तूप भारतीय ऊपखंडा व्यतिरिक्त  कुठे बनवले जात असेल का हा संशोधनाचाच विषय आहे.


आता हे घराघरातलं लोणकढं तूप तेही जर गायीचे असेल तर आयुर्वेदाने सगळ्या फॕट्समधे सर्वोत्तम सांगितले आहे. तेलापेक्षाही. 


तूप हे 'संस्कारस्य अनुवर्तनात' म्हणजे ज्या पदार्थासोबत द्याल त्याचे गुणधर्म वाढवते असे आहे , म्हणूनच आयुर्वेदामधे औषधीयुक्त अशा सिद्ध घृताचा वापर केलेला आहे.


नुसते तूप हे निरोगी माणसाने रोज जरूर खावे. भूक लागत नसेल तर जेवताना मधे थोडे तूप आणि सैंधव एकत्र करून खावे.आजारी माणसाने मात्र खावे की न खावे किती खावे हे वैद्यांच्या सल्ल्याने ठरवावे. कारण सामता असणार्या आजारात तूप नाही असे सांगितले आहे. नी सामता ही वैद्यालाच समजू शकते. 


बर्याचशा कान नाक घश्याच्या रोगांमधे मूळव्याधीमधे स्मरणशक्ती टिकवण्यासाठी म्हणून तूपाची निवळी म्हणजे तूप बनवल्यावर वर जो पातळ भाग राहातो तो , ऊपचार म्हणून सांगितली आहे. 


मात्र हृदयरोग डायबेटीस बिपी वगैरे जीवनशैलीच्या आजारात रोज दोन चमचे गायीचे लोणकढं तूप बिनधास्त खायला हरकत नाही. त्याने कोलेस्टेरॉल वगैरे काही वाढत नाही.


मी तूप खायचे की नाही अशी काहीजणांची शंका असेल तर तुमचा त्रास सांगा ईथेच. डॉक्टर (वैद्य ) स्वतःच येथे मार्गदर्शन करतील . फक्त तूप खावे की नाही हे विचारायला क्लिनिक ला प्रत्यक्ष यायचीही गरज नाही.

9226958538


डाळिंब - हृदयमित्र

 डाळींब - हृदयमित्र



डाळींब आपल्याकडे मुबलक प्रमाणात ऊपलब्ध असते.आयुर्वेदामधे डाळींब हे हृदयासाठी ऊत्तम फळ सांगितले आहे. ( हृद्य ) 

डाळींबावर आतापर्यंत विविध संशोधन झालेले आहे. त्यातूनही हेच सिद्ध केलय 

1. डाळींब हे रक्तवाहीन्यांसाठी प्रोटेक्टीव असे काम करते. म्हणजे ब्लॉकेजेस तयार होण्याच्या सुरूवातीच्या अवस्थेपासूनच काम करते. 

आणि म्हणूनच हृदयरोग्याने रोज डाळींब खावे.

2. डाळींब हे वारंवार लूज मोशन होणे किंवा ईरीटेबल बॉवेल सिंड्रोम यात ऊपयोगी आहे.

3.सूज येणार्या संधीवातातही डाळींब ऊपयोगी पडते. 

4.डाळींबांच्या पानामधे वजन कमी करण्याचा गुणधर्म आहे.

असे बरेच गुण डाळींबात आहेत.

मग काय सुरू करा जेंव्हा मिळेल तेंव्हा डाळींब खायला. हां ..मात्र डाळींब हे गोड आणि आंबट अश्या दोन प्रकारात मिळते. हायपरॲसिडीटी होत असेल तर फक्त आंबट डाळींबखाऊनये.

अन्यथा ताप ,खोकला ,सर्दी, असेल  पोट बिघडले असेल , अपचन असेल , सांधेदुखी असेल हृदयरोग असेल ,बिपी ,डायबेटीस असेल ...सर्वांनी डाळींब खा.

सोलून खा ,रस काढून खा. मात्र रस काढताना साखर मीठ घालू नका. 

ऊपाशी पोटी खा जेवणानंतर खा.

डाळींब खा आरोग्यपूर्ण राहा . 



रविवार, १० जुलै, २०२२

ऊपवास


 उपवास – 

उपवास म्हणजे आयुर्वेदातील लंघनाचाच एक प्रकार आहे. बर्याच रोगांमध्ये लंघन उपयोगी असते . ज्यांना शक्य आहे आणि ज्यांना वैद्यकीय दृष्ट्या  लंघन चालते त्यांनी उपवास कडक करायला हरकत नाही. पण मग बाकीच्यांनी काय खावे बरे ?

आषाढी /कार्तिकी एकादशी , चतुर्थी , असे धार्मिक उपवास बरेच जण करतात.पण मग बरेच वेळा एकादशी दुप्पट खाशी अशी म्हणच खरी करायची वेळ येते. ते होऊ नये म्हणून आपल्याकडे पारंपारिक रित्या जे उपवासाचे पदार्थ आहेत त्यातल्या काही  पदार्थांची माहिती तुम्हाला करून देणार आहे. 


          भगर – याला वरीचे / वरइचे तांदूळ असे म्हणतात. काही भागात तांदुळाच्या भाताऐवजी याचाच भात खातात .याला संस्कृत मध्ये श्यामाक असे म्हटले आहे. भगर पचायला हलकी असते. भगर पित्तकारक असते असा एक गैरसमज आहे. परंतु आयुर्वेदात भगर थंड सांगितली आहे. अति पोषण ( स्थौल्य ) झाल्यानंतर वजन कमी करण्यासाठी जे आहारीय पदार्थ वर्णन केले आहेत त्यात भगरीचा उल्लेख आहे. भगर हि आयुर्वेदात तृणधान्यांमध्ये सर्वोत्तम सांगितली आहे. पचायला हलकी आणि रुक्ष शोषण करणारी असल्याने लंघनाचे सर्व हेतू भगर खाऊन साध्य होतात. त्यामुळे उपवासाला उत्तम . याच कारणाने स्थौल्य आणि डायबेटीस , हृदय विकाराच्या रुग्णांमध्ये  चालणार आहे.


        राजगिरा - याला amaranth म्हणजे ग्रीक भाषेत immortal असे म्हटले आहे. राजगिर्याला रामाचे धान्य असे म्हणतात. राजगिर्याचे पोषण मूल्य ऊच्च दर्जाचे आहे. ग्लुटेन फ्री असून त्यात फॉस्फरस पोटॕशियम कॕलशियम प्रोटीन्स आणि फायबर असतात. आयुर्वेदात राजगिरा पचायला जड सांगितला आहे मात्र त्याच्या लाह्या पचायला हलक्या असतात. राजगिर्याच्या लाह्यांच्या पीठाचे पदार्थ बनवून खावे. डायबेटीस नसेल , वजन प्रमाणात असेल तर आणि लहान मुलांसाठी राजगिर्याचा लाडू हा अत्यंत पोषक पदार्थ समजता येईल. मात्र  ऊपवासाच्या दिवशी हा प्रमाणातच खावा. 


शिंगाडा.

हाही एक ऊपवासातला पदार्थ आहे ज्याला ईंग्रजीत water chestnut असे म्हणतात. हाही अत्यंत पोषक असा पदार्थ आहे . यातही बी व्हीटॕमीन्स पोटॕशियम मॕगेनीज कॉपर रीबोफ्लेविन अशी सूक्ष्म पोषकतत्वे असतात. आयुर्वेदातही हा पोषकच सांगितला आहे. पचायला जड थंड असून ग्राही म्हणजे लूज मोशन होत असताना द्यावयाचा पदार्थ आहे. त्यामुळे खरे तर शिंगाडा ऊपवासाला जपूनच खावा. 

  साबूदाणा या अत्यंत आवडीच्या पदार्थाबद्दल खूप काही लिहीलं बोललं गेलय त्यामुळे त्याची माहीती ईथे मुद्दामच टाळलीय.


ऊपवासाचे पदार्थ असे काही आयुर्वेदात वर्णन नाही. एखादा पदार्थ ऊपवासाला का चालतो नी एखादा का नाही ? खरे तर पचायला हलके पदार्थच फक्त ऊपवासात चालायला हवे. पण असे प्रत्यक्षात दिसत नाही. परंपरेने अनेक पदार्थ ऊपवासाला चालणार्या यादीत हळूहळू समाविष्ट झालेले दिसतात. 

'काय खावे' या पेक्षा ऊपवास 'का करतोय' या हेतूकडे जास्त लक्ष दिले तर काय खावे हा प्रश्न प्रत्येकाला आपल्यापुरता सोडवता येईल.

धार्मिक कारणासाठी ऊपवास करताना तुम्ही आरोग्यपूर्ण असाल तर मग ऊपासाच्या पदार्थांच्या रेसिपी असा भरपूर वाव आहे.

पण धर्मासोबत आरोग्याची आकांक्षा असेल तर कमी सात्विक अन्न  खावे . सात्त्विक आणि हलके या रकान्यात फळे , साय काढलेले दूध ,ताक येवढ्या गोष्टी नक्की बसतात. मग एक दिवस फक्त पातळ पदार्थ आणि फळांवर राहील्यावर किती हलकेपणा येतो ते अनुभवून जरूर बघा. 

बिपी डायबेटीस हृदयविकार असणार्यांनी ऊपवास करू नये असा गैरसमज आधुनिक शास्त्राच्या डॉक्टरांनी ईतका रूजवला आहे की तो मनातून काढता काढता कठीण जाते. हे वरचे रोगी नक्कीच ऊपवास करू शकतात. ऊलट काही वेळेस तर ऊपवासाने सुद्धा रोगाची तीव्रता कमी होते.मात्र योग्य त्या वैद्यांचा सल्ला घेऊनच या प्रकारच्या रूग्णांनी ऊपवास करावा. 

तुम्हाला ऊपवास कसा करायचाय  पण त्याबद्दल मार्गदर्शन हवे असल्यास खालील नंबरवर वाॕट्सप करावे. 

9226958538

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

स्त्रियांमधला हृदयरोग

 

           हृदयरोग आणि स्त्री असे म्हटले की स्त्रियांना सर्वसाधाराणपणे हृदयरोग होत नाही असे म्हटले जाते . हे काही प्रमाणात खरे आहे .ते कसे ?

          ईस्ट्रोजेन हे एक स्त्री विशीष्ठ हार्मोन आहे . या हार्मोनची निर्मिती चाळीशीनंतर हळूहळू कमी होते व मेनोपॉजनंतर (मासिक पाळी गेल्यानंतर )तर अगदीच कमी होते. हे ईस्ट्रोजेन हृदयसंरक्षक समजले जाते . खर तर याचं काम या बाबतीत नक्की कसं चालतं हे पूर्णपणे समजलेले नाहीये , पण LDL हे हृदयासाठी वाईट समजले जाणारे कोलेस्टेरॉल इस्ट्रोजेनमुळे नियंत्रणात राहाते . इस्ट्रोजेनमुळे रक्तवाहीनीचे आतले अस्तर ( endothelium) याचे स्वास्थ्य ईस्ट्रोजेनमुळे टिकून राहाते . त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहीन्यांचा आजार (blockages ) अडथळे निर्माण होत नाहीत . आता पाळी गेल्यावर रक्तवाहिन्यांचे हे संरक्षण नाहीसे होते आणि हृदय रोगाची शक्यता स्त्रियांना पुरुषाएवढीच वाढते .

              दुसरं असं की वैद्यकीय जगतात जे हृदय रोगावर संशोधन झाले ते नाईलाजाने पुरुषप्रधान होते . म्हणजे संशोधनासाठी जे स्वयंसेवक येत असत ते जास्त प्रमाणात पुरूष असतं (सामाजिक मर्यादेमुळे ) त्यामुळे फक्त स्त्रियांचा संशोधनासाठी असा विचार केला गेला तो जे खास स्त्रियांचे आजार असतात त्यासाठीच . स्त्रियांच्या रक्तदाब मधुमेह हृदयरोग याबाबतीत  वेगळा डेटा अनेक वर्षे नव्हताच. अलीकडे अशी स्त्रियांबाबत माहिती गोळा केली जाऊ लागली .

     आपण वर पहिले की मेनोपॉज नंतर स्त्रियांना नी पुरुषांना सारख्याच प्रमाणात हृदयरोगाची शक्यता असते .

मात्र स्त्रियांचा हृदयरोग थोडा वेगळ्या स्वरूपात होते .

1   अंजायनाचा ( चालल्यानंतर छातीत दुखणे ) त्रास झाल्यानंतर angiography केली तर Non Obstructing Coronary Disease चे प्रमाण स्त्रियांमधे जास्त सापडते . (म्हणजे ब्लॉकेजेसचे प्रमाण 60% पेक्षा कमी असते )

2     
 तसेच चालल्यावर दम लागणार्या आणि हार्ट फेल्युअरची लक्षणे असणार्या स्त्रियांची हृदयाची सोनोग्राफी केली (2d echo ) तर हृदयाची पंपिंग क्षमता मात्र नॉर्मल सापडते , याला वैद्यकीय भाषेत heart failure with preserved ejection fraction असे म्हटले जाते .

    त्रास होतोय हार्ट फेल्युयर आहे पण अशा स्त्रीचे रिपोर्ट असे जवळजवळ नॉर्मल  आल्यानंतर बरेचदा ट्रीटमेंट कडे गांभिर्याने पाहीले जात नाही कधी कधी डॉक्टर सुद्धा ६०% पेक्षा  कमी ब्लॉकेजेस आहेत म्हटल्यावर बाकी काहीच बोलत नाही .त्यामुळे स्त्रियांच्या हृदयरोगाकडे दुर्लक्ष केले जाते  पण अशा वेळेस जीवनशैली सुधारणा तातडीने केली पाहीजे. हृदयरोग झाल्यावर धावपळ करण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून जास्त काळजी घेतली पाहीजे . मग असा काही आरोग्याचा मापदंड आहे का की तो लाऊन आपले हृदयाचे आरोग्य किती चांगले आहे किंवा किती धोक्यात आहे ? हे कसे तपासता येईल ? हो.  त्या निमित्ताने खास स्त्रियांवर झालेल्या संशोधनाचा आढावा सांगणं खूप महत्त्वाचे वाटतय .

             शिकागो युनिव्हर्सिटीत एक सेंट जेम्स टेक हार्ट नावाचा एक प्रोजेक्ट राबवला गेला . त्यात ५० शीच्या आसपासच्या 5721 स्त्रियांनी भाग घेतला . नी पुढे आठ वर्षे या स्त्रियांच्या आरोग्याचा पाठपुरावा केला गेला . त्यातल्या एकदोनच महत्त्वाच्या गोष्टी मी येथे नमूद करते. या सर्व स्त्रियांची व्यायामक्षमता मेट (MET ) मधे मोजली . म्हणजेच त्यांची स्ट्रेस टेस्ट केली( ट्रेडमिल टेस्ट ) . या सर्व स्त्रियांना कोणताही त्रास होत नव्हता. तेंव्हा खालील गोष्टी लक्षात आल्या.

ज्या स्त्रियांची व्यायामक्षमता 8 मेट आणि त्यापेक्षा जास्त होती त्यांच्यामधला पुढच्या 8 वर्षातला मृत्यूदर सगळ्या कमी होता .

ज्या स्त्रियांची व्यायामक्षमता 5 मेटपेक्षा कमी होती त्यांच्यात पुढच्या 8 वर्षातला मृत्यूदर सगळ्यात जास्त होता .

तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मधुमेह ऊच्चरक्तदाब वाढलेलं वजन वाढलेलं कोलेस्टेरॉल ही  हृदयरोगाची कारणे आहेत . पण हे आजार  असणार्या स्त्रिची व्यायामक्षमता जर 8 मेट असेल तरीही तीचा धोका कमी असतो . म्हणजे तुमची मेट ची क्षमता हा तुमच्या हृदयाच्या आरोग्याचा मापदंडच झाला .

    मग या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर  असे वाटते की ४० नंतरच्या प्रत्येक स्त्रीने ही स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी 8 मेटच्या खाली क्षमता असणार्या स्त्रीयांनी डॉक्टरांच्या मदतीने त्याची कारणे शोधावी आणि त्या कारणांवर काम करावे ( कारणे - व्यायामाचा अभाव ,वाढलेलं वजन , हीमोग्लोबीन कमी असणे, उच्चरक्तदाब व रक्तातली साखर बराच काळ वाढलेली असणे )

   आज स्त्री दिनानिमित्त आपला हृदयाच्या आरोग्याचा मापदंड  जागेवर आहे की नाही हे तपासून पहावा . आणि तो जर 8 मेट पेक्षा कमी असेल तर वैद्यकीय सल्ल्याने त्याची करणे शोधून ती दूर करावीत. ही मेट मधली क्षमता ट्रेडमिल टेस्ट करून कळते.

धन्यवाद

डॉ. आनंदी साठये

B.A.M.S, M.D.

8975394110

 

 

ब्लॉकेजेससाठी अँजिओप्लास्टि हाच एकमेव पर्याय आहे का ??

  डॉक्टर रोहित साने .                             काही दिवसपूर्वीच एक रुग्ण माझ्यासमोर बसला होता डोळ्यात भीती आवाजात घाबरटपणा , म्हणाला ,...